जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जम्मूच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्याची बातमी आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. हा वनक्षेत्र असल्याने सुरक्षा दलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती
राजौरीतील कालाकोट पोलीस ठाण्यांतर्गत बाजी गावातील जंगलात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या इनपुटच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर त्या भागात चकमक सुरू झाली.
या कारवाईत सुरक्षा दल ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने परिसरातील दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून आहेत. हे वनक्षेत्र असल्याने सुरक्षा दलांसाठी हे मोठे आव्हान असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार होत आहे. तीन दिवसांपूर्वी राजौरीतील बुधल गावात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते, त्यानंतर सतत शोध मोहीम सुरू होती.