सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार ‘हे’ म्युझियम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार ‘हे’ म्युझियम. लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. आता त्यापुढे जाऊन गणिताची गोडी लागावी यासाठी लवकरच गणित म्युझियम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, इनोव्हेशन केंद्राच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर उपस्थित होत्या.

करमळकर म्हणाले, चौथीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या गणित म्युझियम खेळाच्या माध्यमातून गणित विषय शिकविण्यात येईल. ही संकल्पना पंतप्रधान कार्यालयातून आली आहे. यासाठी भारत फोर्ज कंपनीचे बाबा कल्याणी यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

कोविडकाळात विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे आम्ही सकाळच्या वेळात विद्यापीठाच्या परिसरात प्रदर्शन भरविले. विद्यापीठात सकाळच्या वेळात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील आहे. सीफोरआयफोर प्रयोगशाळा, रिसर्च पार्क फाउंडेशन, सायन्स पार्क, स्पोर्टस कॉम्प्लेक्स असे अनेक उपक्रम त्यासाठी सातत्याने करीत आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच प्र-कुलगुरू व कुलसचिव यांचे मोलाचे योगदान आहे, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.

विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

विद्यापीठातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार यावेळी जाहीर केले. उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाज कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीज पद्मश्री विखे पाटील कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या विभागामध्ये डिपार्टमेंट ऑफ ॲटमोस्फेरिक अँड स्पेस सायन्स यांना जाहीर झाले; तर वैयक्तिक पातळीवरील पुरस्कार यावेळी घोषित करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.