राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या महाराष्ट्रात…

0

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, मंगळवारी 4 जुलै रोजी विविध कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रात येत आहेत. महामहीम मुर्मु यांचे सायंकाळी नागपुरात आगमन होणार आहे. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

4 जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन व आरतीमध्ये त्या सहभागी होतील. त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

6 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील. राष्ट्रपतींच्या दौ-यासाठी प्रशासन सज्ज असून कार्यक्रमस्थळी तसेच शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांचे उद्या, मंगळवार दि. 4 जुलै रोजी दुपारी 3.15 वाजता शहरात आगमन होईल. राष्ट्रपती महोदयांसमवेत विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या,  दि. 4 जुलै रोजी सायंकाळी 6.15 वाजता शहरात आगमन होईल.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनप्रसंगी ते विमानतळावर उपस्थित असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.