पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून विज्ञानाचे एकमेव नोबेल पुरस्कार विजेते भारतीय डॉ. सी.व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

यानिमित्ताने देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी,विज्ञान क्षेत्रात केलेले प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे, देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देऊन लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढविणे या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोदार स्कूलचे उप-प्राचार्य दीपक भावसार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौर्य मेहता व आर्यन छाबडा या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शारदेचे प्रतिमापूजन माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी डॉ.सी.व्ही.रामन व भारतीय आण्विक शक्तीचे प्रणेते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.भूषण कविमंडन(जीवरसायन शास्त्र विभागप्रमुख) तसेच विज्ञान प्रकल्प स्पर्धेत पंच म्हणून डॉ.मनोजकुमार चोपडा,(सहयोगी प्राध्यापक प्राणीशास्त्र) एम. जे.कॉलेज जळगाव, डॉ.प्रेमजीत जाधव(सहा. प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग) एम. जे.कॉलेज जळगाव, डॉ.ओंकार साळुंके सहाय्यक प्राध्यापक (भौतिकशास्त्र विभाग) एम. जे.कॉलेज जळगाव, विक्रम पाटील (सहयोगी प्राध्यापक जीवशास्त्र  विभाग) पिंपळगाव हरेश्वर, यांची विशेष उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांनी स्पर्धकांना प्रोत्साहित करून डॉ.अब्दुल कलाम विज्ञान –तंत्रज्ञान मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या. नोबेल पारितोषिक विजेते डॉ.सी व्ही.रामन यांच्या कारकिर्दी बद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विज्ञान विषय व वैज्ञानिक दृष्टीकोन याचे महत्व विषद केले. विज्ञानाची कास धरून प्रगतीचे मार्ग सुकर होतात. त्याचा उपयोग मानव कल्याणासाठी केला पाहिजे. प्रयोग आणि संशोधनाला पुढच्या पातळीवर न्यायला हवे असे मत त्यांनी यावेळी मांडले.

या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी वर्गनिहाय विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘डॉ. अब्दुल कलाम विज्ञान-तंत्रज्ञान  मेळावा ’ या नावाने आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गटातूनसहभाग नोंदवला.

इ.१ली व २री साठी पोस्टर बनवणे ह्या स्पर्धे अंतर्गत ‘प्राणी व त्यांचे अधिवास, आपले पर्यावरण, आरोग्य आपले हे विषय दिले होते. इ.३री ते ५वी ‘सूर्यमंडळ-जीवसृष्टी, जलसंवर्धन, दळणवळण व अविष्कार, गणित आणि आपण ह्या विषयावर आधारित मॉडेल बनवणे व पोस्टर सादरीकरण ही स्पर्धा घेण्यात आली. इ.६वी ते ९वी साठी मॉडेल सादरीकरणसाठी  घनकचरा व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नाविन्यपूर्ण गणित वर्ग हे विषय देण्यात आले होते.

विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कल्पकता, मॉडेल तयार करतांना नाविन्यपूर्ण रेखाकृतीचा वापर, वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक कौशल्य, तसेच सादरीकरण कौशल्य यावर आधारित मुल्यांकन केले गेले. शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून गौरविले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार, मुख्याध्यापिका उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले. आभार प्रदर्शन प्रज्वल शहा या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.