पाचोऱ्यात १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात राहणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागातील रहिवासी राजदत्ता नरेंद्र पवार (१८) हा इयत्ता १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत होता. सर्वत्र १२ वी ची परीक्षा सुरू आहे, दि. २७ रोजी फिजिक्सचा पेपर राजदत्ता याने दिला होता. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी पेपर नसल्याने राजदत्ता हा घरीच होता. सायंकाळी ५ वाजता राजदत्ता याने मित्रास अभ्यास करण्यासाठी घरी बोलावले होते. राजदत्ता यांचे मित्र ५ वाजेच्या सुमारास राजदत्ता याचे घरी आले असता राजदत्ता हा घराचा दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. यावेळी राजदत्ता पवार हा घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळुन आल्याने मित्रांनी एकच आक्रोश केला. राजदत्ता याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन, पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विकास खरे हे करीत आहेत. राजदत्ता याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. राजदत्ता याच्या अकस्मात निधनाने परिसरात एकच खळबळ उडाली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.