मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून मुंबईतील एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसतील.
मुंबई येथील राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मोदी आणि ठाकरे एका मंचावर उपस्थित राहतील. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांविरोधात केंद्रातील भाजप सरकारकारे ईडी आणि सीबीआयच्या कारवाया सुरु केल्याचा आरोप नेहमीच ठाकरे सरकारच्या वतीनं करण्यात येतो.
राज्यातील भाजपाला केंद्रातील भाजपचं अभय असल्यानं त्यांनी महाराष्ट्र सरकारवर मोठा दबाव आणल्याचंही बोललं जातं. या पार्श्वभूमीवर दोन्ही परस्पर विरोधी पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं या कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीतही शिवसेनेला भाजपासमोर हार पत्करावी लागली आहे. यामुळे दोन्ही नेते मंचावरून एकमेकांवर काय टीप्पणी करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 14 जून रोजी दुपारी मुंबईतील राजभवानातील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी येथील क्रांतिकारी गॅलरीचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही हजेरी असेल.