पी.जे. रेल्वेसाठी खात्याचा वेळकाढूपणा !

0

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून म्हणजे 22 मार्च 2020 पासून बंद करण्यात आलेली पाचोरा- जामनेर (पीजे) नॅरोगेज रेल्वे अद्याप सुरु झालेली नाही. ही रेल्वे गरिबांची रेल्वे म्हणून ओळखली जाते. देशातील इतर सर्व रेल्वे गाड्या सुरु झाल्या. परंतु पाचोरा- जामनेर ही नॅरोगेजची रेल्वे मात्र प्रवाशांची मागणी असताना सुरु करण्यात येत नाही. त्यासाठी पीजे रेल्वे बचाव कृती समितीचीही स्थापना झाली. या कृती समितीच्या वतीने या भागातील ग्रामस्थांनी आंदोलन केले.

कृती समितीच्या सदस्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या शिष्ट मंडळासमवेत जळगाव लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार उन्मेश पाटील आणि रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार श्रीमती रक्षा खडसे हे दोघे उपस्थित होते. पीजे रेल्वे बचाव कृती समितीची मागणी रास्त असल्याची पुष्टी खा. उन्मेश पाटील आणि खा. रक्षा खडसे यांनी मंत्री रावसाहेब दानवेंना दिली आणि ही रेल्वे सुरु झाली पाहिजे अशी मागणी केली.

यावेळी रेल्वे राज्यमंत्र्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी विशेषत: भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांशी फोन वरुन संपर्क साधून चर्चा केली. पीजे रेल्वे करायची असेल तर 25 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना सांगितले. त्यावर रेल्वे मंत्रालय 25 कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे. परंतु पी.जे. रेल्वे सुरु झाली पाहिजे, असे दानवे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिली.

यावेळी पी. जे. बचाव कृती समिती सदस्य आणि दोन्ही खासदार हे सर्व ऐकत होते. त्यानंतर पी.जे. रेल्वे कोणत्याही परिस्थितीत सुरु होईल, असे आश्वासन दिले. तथापि त्याला किती कालावधी लागेल हे मात्र दानवे यांनी सांगितले नव्हते. तीन महिने कालावधी उलटला परंतु पी.जे. रेल्वे सुरु होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. उलट पी.जे. रेल्वेचे ब्राँडगेज करुन हायस्पीड रेल्वे गाड्या या ट्रॅकवरुन धावतील.

यासाठी भुसावळ रेल्वे विभागाचे एडीआरएम श्री. मिना यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह जामनेर येथे रेल्वे कार्यालयाला भेट दिली अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नॅरोगेज रेल्वे लाईनची पहाणी केली आणि नॅरोगेज ट्रॅक निकामी झाला आहे. नॅरोगेजचे रेल्वे कोच आता उपलब्ध नाहीत. नॅरोगेजचे डिझेल इंजिन उपलब्ध नाहीत. अशी विविध कारणे देऊन या नॅरोगेजचे ब्राँड गेजमध्ये रुपांतर करण्याचे इस्टिमेट एकुण एक हजार कोटीचे असून ते इस्टिमेट रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून मंजुरी मिळताच नॅरोगेजचे ब्राँडगेजमध्ये रुपांतराच्या कामाला सुरुवात होईल, असे भुसावळ विभागाचे एडीआरएम रुकमय्या मिना यांनी सांगितले.

पाचोरा-जामनेर ही 100 वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या कालावधीत सुरु झालेली ही नॅरोगेज रेल्वेचे ब्राँडगेजमध्ये रुपांतर करण्याचा बहाणा करुन ही रेल्वे बंद करण्याचा रेल्वे खात्याचा डाव आहे. लॉकडाऊनचे निमित्ताने बंद झालेली पी.जे. रेल्वे दोन वर्षानंतर सुरु करण्यास टाळाटाळ रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांकडुन केले जात आहे. पी.जे. रेल्वे सुरु करण्यात येऊ नये असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाला दिल्याचे कळते तसेच पी. जे. रेल्वेच्या काही सामानाची हलवाहलव रेल्वे विभागाकडून करण्यात आली.

पी.जे. रेल्वेचा स्टाफ इतरत्र हलविण्यात आला आहे. पी. जे. बचाव कृती समितीच्या माध्यमातून बोंबाबोंम सुरु झाली. ग्रामस्थांचे आंदोलन झाले म्हणून पी. जे. रेल्वेच्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अधिकाऱ्यांना अधिकचे काम नकोच असते. त्यांचेकडून नकारघंटाच दिली जाणार आहे. परंतु आता कसोटी आहे. लोकप्रतिनिधींची सुदैवाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राचे आणि विशेषत: जळगाव जिल्ह्यालगतच्या जालना जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताहेत. रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. रेल्वे मंत्र्यांकडे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांनी शब्द टाकला तर हे काम सहज होण्याजोगे आहे. रावसाहेब दानवे यांनी पी.जे. बचाव कृती समितीला तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन्ही खासदारांना आश्वासन दिले आहे.

पी. जे. रेल्वे सुरु करण्यासाठी लागणारे 25 कोटी रुपये रेल्वे मंत्रालयासाठी फार मोठी रक्कम नाही. एवढा निधी सहज उपलब्ध होऊ शकतो. परंतु सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्या आश्‍वासनाची जर पुर्ती झाली नाही तर जळगाव जिल्ह्यातील जनतेशी विशेषत: पी. जे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या पाचोरा- जामनेर तालुक्यातील जनतेशी प्रतारणा होईल. त्यांचेवर फार मोठा अन्याय होईल. देशात मोठमोठ्या योजना सुरु केल्या जात असताना असलेली रेल्वे बंद करुन जळगाव जिल्ह्यावर फार मोठा अन्याय होणार आहे.

जामनेर- मुंबई पॅसेंजर रेल्वे सुरु करावी, अशी जनतेकडून मागणी होत असताना पी. जे. रेल्वेच बंद करण्याचा रेल्वे खात्याचा डाव आहे. त्याची भारी किंमत या भागातील लोकप्रतिनिधी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मोजावी लागेल हे विसरुन चालणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.