राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

0

लोकशाही संपादकीय लेख 

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर शरद पवार यांची जळगाव येथे पहिलीच जाहीर सभा झाली. शरद पवार यांचे जळगाव झालेले जंगी स्वागत आणि जाहीर सभेला उपस्थित प्रचंड गर्दीने जळगाव जिल्हा ढवळून निघाला. जिल्ह्यात पक्षातर्फे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील अजित पवार गटासोबत जाऊन मंत्री झाले असले तरी शरद पवारांचे जळगाव शहर आणि जिल्ह्यातील झालेले भव्य स्वागत आणि पवारांच्या जाहीर सभेचे शहर आणि जिल्ह्यात ढवळून निघाला. शरद पवारांच्या आधी झालेल्या नेत्यांची जोश पूर्ण भाषणे लक्ष वेधून घेणारी होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे असे जाणवतच नव्हते. शरद पवारांची जाहीर सभा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एके काँग्रेस एवढ्या पुरतीच मर्यादित होती असे नव्हे, तर महाविकास आघाडीमध्ये एकजन्सीपणा, त्यातून असलेली एकता सुद्धा दिसून येत होती, हे विशेष.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारांचा पराभव करण्याचे ध्येय असल्याचे पवारांच्या भाषणातून जाणवले. त्याचाच परिणाम म्हणजे महापौर सौ. जयश्री महाजन यांचे निवासस्थानी जाऊन शरद पवार यांनी घेतलेल्या भेटीचे विशेष म्हणता येईल. महापौर जयश्री महाजन या शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्य असल्या तरी पक्षात भेदभाव न करता किंवा आपल्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना खेचून आणून आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयश्री महाजन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचा स्वार्थी हेतू न ठेवता महाविकास आघाडी या घटक पक्षाच्या त्या सदस्य आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या त्या सक्षम उमेदवार होऊ शकतात, हे हेरून शरद पवारांनी त्यांची भेट घेणे हा खरा त्यांचा मुत्सद्दीपणा दिसून येतो. याचा अर्थ शरद पवार हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पुरताच मर्यादित संकुचित विचार न करता महाविकास आघाडीचा विचार करतात हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांची ही रणनीती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निश्चित उपयोगी पडणार आहे.

कालच्या शरद पवार यांच्या जळगाव जाहीर सभेने पक्षात फूट पडली असली तरी पक्षाची ताकद आपल्यापाशी असल्याचे त्यांनी सिद्ध केले. दुसरी गोष्ट मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चारी मुंड्या चित केले. आंदोलकांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे सिद्ध केले तर राजकारण संन्यास घेऊ अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा, असे म्हणणाऱ्या दोघा उपमुख्यमंत्र्यांची शरद पवारांनी हवा काढून घेतली. त्या मराठा आंदोलकांवर लाठी हल्ल्याचे संदर्भात माफी मागणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य म्हणजे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारला मराठा आंदोलन हाताळण्यात अपयश आले. ते तोंड कशी पडण्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे.

लाठीचार्ज होताच सरळ दुसऱ्या दिवशी माफी मागितली असती, तर महाराष्ट्रभर आंदोलन भडकले नसते हे मात्र खरे आहे. जळगावच्या शरद पवारांच्या जाहीर सभेच्या यशामध्ये माजी मंत्रीद्वय एकनाथ खडसे आणि गुलाबराव देवकरांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्य कर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते आले आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा उत्साह जोश कायम टिकून ठेवला तर आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त करणे सोपे जाईल यात शंका नाही. एकंदरीत शरद पवारांच्या जळगाव जाहीर सभेने उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे. अमळनेरचे माजी मंत्री आमदार ज्येष्ठ भाजपचे नेते डॉ. बी एस पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश अजित गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांना फार मोठा धक्का आहे. कारण अनिल भाईदास पाटील यांनी डॉ. बी एस पाटील यांचे बोट धरून राजकारणात प्रवेश केला. डॉ. बी एस पाटील हे मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे राजकीय गुरु आहेत. त्या डॉ. बी एस पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश तर केलाच पण त्यांच्यावर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात डॉ. बी एस पाटील यांच्या रूपाने अनिल भाईदास पाटील यांना फार मोठा धक्का म्हणता येईल. एकंदरीत शरद पवारांचा जळगाव जिल्हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस साठी चैतन्य निर्माण करणारा आहे असेच म्हणावे लागेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.