धक्कादायक : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात आणखी १५ रुग्ण दगावले !

0

शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्या नांदेड दौऱ्यावर

नांदेड ;- नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविदयालयात गेल्या २४ तासात अजून १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात ६ अर्भक, २ बालकांचा समावेश आहे. . गेल्या ७ दिवसात ८३ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात ३७ अर्भक आणि बालकांचा समावेश आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्या नांदेड येथे येणार असून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत.

या शासकीय रुग्णालयात औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. . विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, यांनी या रुग्णालयाला भेट देत सरकारवर निशाणा साधला होता. परंतु या रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या रुग्णालयात २४ तासात पुन्हा १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शासकीय रुग्णालयात औषधी पुरवठा करणाऱ्या हाफकीनने औषधी खरेदी बंद केली आहे. यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान या सर्व प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. .

तर उच्च न्यायालयाने देखील सरकारला खडेबोल सुनावलेत. “राज्यात आरोग्य सेवेवर मनुष्यबळ कमतरतेचे दडपण आहे असे उत्तर देऊ नका, अशा शब्दात महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांची कानउघडणी न्यायालयानं केली असून राज्य सरकार या नात्याने जनतेला मुलभूत सेवा पुरवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

आदित्य ठाकरे उद्या नांदेड दौऱ्यावर

शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उद्या सोमावरी नांदेडमध्ये येत आहेत. ते शासकीय रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. ठाकरे हे सकाळी 11:30 वाजता विशेष विमानाने नांदेड विमानतळावर पोहचतील. त्यांच्या समवेत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.