खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा;आमदार जयकुमार रावल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

खानदेशमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला आहे. पावसाने दीड महिन्यापासून दडी मारली आहे. त्यामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. आता जरी पाऊस झाला तरी, पिकांना जीवनदान मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे खानदेशात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची वेळ आली आहे. त्याचसंदर्भात माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे.

त्यांनी सांगितले की, पावसाअभावी खरिपातील पिके हातची गेली आहेत. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. कमी पावसामुळे जलस्रोतांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर लागवडीवर परिणाम झाला आहे. कापसाची वाढ खुंटली आहे. या सर्व स्थितीचा शेतीप्रधान खानदेशातील अर्थकारणावर यासर्वांचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिंदखेडा मतदारसंघात बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न आहे.

ही संपूर्ण स्थिती लक्षात घेता खानदेशात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, पीक विमा मंजूर करून काही रक्कम अग्रीम द्यावी, अशी मागणी आमदार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.