जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाविकास आघाडीमध्ये तूट पडते की फूट पडो याने मला फरक पडत नाही. मी शिवसैनिक आहे. मी इंजिनाकडे बघतो डब्यांची मला काही पडलेली नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात भव्य माता व बाल संगोपन हॉस्पिटल उभारण्यात येत असून आज या इमारतीच्या कामाचे भूमिपुजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीमध्ये फूट पडते की काय ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर याबाबतच्या बातम्या देखील दैनिकांमधून व विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. याबाबतच आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थेट मला काही फरक पडत नाही. मी शिवसेनेचा आहे. अशा शब्दात उत्तर दिल्याने आता महाविकासआघाडीत फूट पडणार की काय ? या चर्चांना उधाण आले आहे.
कोविडच्या आपत्तीमुळे जिल्हा आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. यामुळे या आपत्तीवर आपण यशस्वीपणे मात केली असून आता माता व बाल संगोपन हॉस्पिटलच्या माध्यमातून नवजात शिशू आणि प्रसूत मातांसाठी अतिशय अत्याधुनिक अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे १०० खाटांचे रूग्णालय मॉडेल हॉस्पीटल म्हणून लौकीकास येणार असून ते गोरगरिबांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते शासकीय आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांची सुविधा असणार्या आणि तब्बल २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेल्या माता व बाल संगोपन केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. सदर हॉस्पिटल हे सुमारे १३ ते १४ महिन्यांमध्येच पूर्ण होणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. प्रमोद पांढरे, इंजि. हरिष पवार, किशोर पाटील, योगेश जावरे, संगोयोचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, आरोग्यसेवक डंपिं सोनवणे, भूषण पाटील, डॉ. गायकवाड, ठेकेदार गणेश ठाकरे यांच्यासह डॉक्टर व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.