Thursday, February 2, 2023

राम म्हणता न लगे आणिक सायास | केले महादोष तेही जळती.. ||

- Advertisement -
  • मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान यांचं नाव घेतल्याबरोबर भूत पळून जातात. मोठमोठी पापे नाहीशी होतात. राम-राम म्हणतांना यम देखील अशा व्यक्तीला घाबरून जातो. एवढे सामर्थ्य राम नामात आहे. कलियुगात संत रामदास स्वामींनी राम-हनुमंत यांची उपासना केली.

संत तुकोबारायांनी राम नामाची महती आपल्या सार्थ १२ अभंगातील काही निवडक अभंगाद्वारे भाविक भक्तांना सांगितली आहे ते म्हणतात..

राम नाम म्हणता तरे जाणता नेणता | हो का याती भलता कुळहीन ||
राम म्हणता न लगे आणिक सायास | केले महादोष तेही जळती ||

ज्यांना जाणिवा आहेत. अध्यात्म ज्ञान भक्ती मुक्तीची जाणीव आहे ने जाणते आणि नेणते कोण सन्मार्ग दाखवून जे मुक्ती पंथाकडे घेऊन जातात ते नेणते. नेणते आणि नेते यात फारसा फरक नाही. फक्त मार्ग बदल आहे. परमेश्वराच्या भक्तीत कसे रममाण व्हावे रमून जावे हे संत मार्गदर्शन करतात. गुरु केल्यानंतर सद्गुरु मुक्तीचा मार्ग दाखवितात पण याउलट जर एखाद्या भल्या माणसाने नेणत्या नेत्याची संगत धरली तर नेता सन्मार्गाकडे नेईलच अशातला भाग नाही? . अध्यात्म क्षेत्राला नेणता आत्मसुख देतो. राजकीय क्षेत्रातील नेणता नेता (येथे जो नेतो तो नेता) दुःखच देतो हे चाणाक्ष व्यक्तीच्या कधीच लक्षात आले आहे.

- Advertisement -

म्हणून समाजात सामाजिक कार्यकर्ता असो वा राजकीय त्यांच्या वाटेला जाण्याचे सामर्थ्य हिंमत भला सज्जन माणूस करीत नाही आणि लोकशाही शासन प्रणालीत हेच घडते. सभ्य, शालीन, विनम्र, बुद्धिवंत, माणूस श्रेष्ठ राजकारणी का ठरत नाही हा त्याचा दोष नाही नेणत्याचा आहे. लबाड बोलणारा, वारेमाप पैसा कमविणाऱ्या सत्ता संपत्तीच्या बळावर माणसं कार्यकर्ते यांना खतम करणारा नेता मोठा जरूर होतो. मद मत्सर अहंकाराने चूर झालेल्या या नेत्याचे मग एक दिवस असे घडे भरतात की त्याला पळता भुई थोडी होते. तो कोट्याधीश असला तरी त्यांना जेल होते. संपत्तीचे भोग त्याला वाचू शकत नाही. संत तुकोबारायांच्या कालखंडात फंदफितुरी करणारे मांडलिक राजे होते. छत्रपती शिवरायांसारख्या सद्सद्विवेक गुणी राजा होता. मोगल साम्राज्यात सुरा सुंदरी धनसंपत्तीच्या बळावर आजचे नेते ज्याप्रमाणे सत्तेचा माज आल्यासारखा उपभोग घेतात तसे काही मुगल राजे सरदार होते. छत्रपतींचे नेते दादोजी कोंडदेव होते. मार्गदर्शक जिजाऊ माँसाहेब होत्या. म्हणून राजे आदर्श नेते म्हणून घडले. जाणता नेत्यांचा हा इतिहास संत तुकोबारायांनी अनुभवला होता. म्हणून त्यांनी राम नामाचा महिमा सांगताना म्हटले आहे:-

राम म्हणतात तरे भवसिंधु पार | चुके येरझार म्हणता राम ||

नुसता राम शब्द मुखातून उच्चारला तरी संसार रुपी भवसागर तरुन जातो. एवढेच काय राम नामाची दोन अक्षर मारुती अंगद महाराजांनी दगडांवर लिहून समुद्रात सोडले पाषाण करून जात होते. संपूर्ण वानरसेना सेतू पार करून लंकेत गेली. हा राम राज्यातला धडधडीत पुरावा आहे. राम राम म्हणतांना कंठाशी प्राण आलेल्या जटायूने प्रभू श्रीरामचंद्रांच्या मांडीवर प्राण सोडला हे त्याचे केवढे मोठे भाग्य.. ।

तुका म्हणे हेचि सुखाचे साधन | सेवी अमृतपान एका भावे ||

संत श्रेष्ठ तुकोबारायांनी राम नाम महात्म्य सांगताना शेवटच्या चरणात अगदी निक्षून सांगितले आहे, हे मानवा, तुला सुख पाहिजे ना ? तर मग राम राम म्हण. तेच खरे अमृत आहे. याच अमृताने जीवन अजरामर होईल उद्धार होईल. आपल्या जाणिवा समर्थ कर भलत्याच्या मागे पळू नको. धन, संपत्ती, ऐश्वर्य, लोभ धरू नको. सन्मार्गाने जा चांगल्या नेणत्याची संगत धर (नेता नव्हे) आजचे नेते हे क्षणिक राजकारणातले मित्र होतात, परंतु वेळ आल्यावर ते शत्रू होतात. अध्यात्म ज्ञानात संत, गुरु हे तुला जो मार्ग दाखवतील तो कल्याणपंथ ठरणार आहे. समाधी सुखाचा आनंद तुला ते नेत्यांच्या नव्हे तर जाणत्या नेत्यांच्या सहवासात मिळेल. स्पष्ट साध्या सोप्या भाषेत सहज आकलन होईल अशा अभंगवाणीद्वारे तुकोबारायांनी संसारी जीवाला परमार्थ अर्थ सांगितला आहे.

रमेश पाटील
९८५०९८६१००

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे