संतांचा कळवळा

0

आषाढी कार्तिकी एकादशी निमित्ताने प्रतिवर्षी घडणारी पंढरीची पायी वारी हे वारकरी फार मोठे पुण्यकर्म मानतात पंढरीची पायी वारी ही वारकऱ्यांसाठी व त्याच बरोबर सामान्य भक्तजनांसाठी देखील एक पर्वणीच असते. पंढरीच्या पांडुरंगाची भेट घेण्याची आंतरिक ओढ़ पांडुरंगावरची मनातली दृढ श्रद्धा, अंतरंगातील भक्तिभाव या सर्वांपुढे ऊन, वारा, पाऊस याची तम न बाळगता पायी पंढरीस पोहचणे व विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणे यातच जन्माचे सार्थक मानणारे वैष्णव या संपूर्ण महाराष्ट्राचे आध्यात्मिक संचितच म्हटले पाहिजे. गेल्या दोन वर्षांपासून महमरीच्या निर्बंधांनी वारी घडली नाही याचे शल्य वारकऱ्यांच्या मनात आहे त्यांची झालेली भावनाविवश अवस्था ही अनेक माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचली त्या निमित्ताने संतांच्या काळात वारी चुकल्याचा अनुभव संतांनाही आला त्याचा धांडोळा घेतला आणि जगतगुरु तुकोबारायांचा एक अभंग वारी चुकल्याचा कळवळा सांगणारा गवसला पंढरपुरास जाता न आल्यामुळे झालेली अवस्था त्यांची तळमळ आणि पांडुरंगाच्या भक्तीपोटी असलेला कळवळा व्यक्त करताना जगतगुरु म्हणतात.

कृपाळू सज्जन तुम्ही संतजन ।
हेचि कृपादान तूच मज॥

आपण सर्व कृपाळू सज्जन आहात म्हणून ही कृपा माझ्यावर करा व मला उपकृत करा पुढे ते म्हणतात..

आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा।
कीव माझी सांगा काकुलती ॥

पांडुरंगास माझी काकुलती पूर्वक आर्जव द्या की सांप्रत स्थितीत मी ठायींच बैसोनि आपले नामस्मरण करतो

अनाथ अपराधी पतित आगळा ।
परी पायावेगळा नका करू॥

स्वतःला अपराधी आणि पतित म्हणून घेऊन भगवंताची करुणा भाकणारे तुकोबाराय पांडुरंगास विनंती करतात की आपल्या चरणी मज जागा द्यावी दूर करू नये यात त्यांचा शुद्ध अंतकरणाने शरणागत भाव दिसतो..

तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी।
मग मज हरी उपेक्षीना॥

संतांनी जर ही आर्जव विठुरायाच्या चरणी ठेवली म्हणजे निरवली तर ती हरी म्हणजे विठुराया जरूर रुजू करून घेईल व माझी उपेक्षा होणार नाही. जगतगुरु तुकोबाराय हे करुणारूप भक्ती सागरच होते, त्यांची विठूरायाची भक्ती हि निष्काम होती म्हणून त्या अधिकार वाणीने त्यांनी आपली विनवणी संतांच्या माध्यमातून पंडरंगच्या चरणी ठेवली वारी चुकली तरी भक्ती भाव दृढ आहे, याची खात्री त्यांनी दिली. परमेश्वर आणि भक्त यांच्यातली नाजूक भावबंधाने या अभंगातून प्रकटतात भक्ती भाव शुद्ध सात्विक असेल तर भगवंत सर्व काही गोड करवून घेतो हेच खरे म्हणून भक्ती भावाची महती माउली हरिपाठात म्हणतात त्या प्रमाणे..

भावेंविण भक्ती ।
बळे वीण शक्ती ।
बोलू नये ॥

म्हणून तुकोबांची हि विनवणी भगवंतांनी गोड करवून घेतली हाच बोध आपण घ्यावा

जय जय रामकृष्णहरी
प्रा. नितीन मटकरी
६ पुतळा पार्क अपार्टमेंट
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.