उद्योजक श्रीराम पाटलांचा निवडणूक लढवण्याचा संकल्प

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांचा आज 26 ऑगस्टला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून लोकसभेसाठी कोणत्याही राजकीय पक्षाने ऑफर दिली तर त्या पक्षाचे वतीने रावेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि राजकीय पक्षाकडून ऑफर मिळाली नाही तर लोकसभा निवडणूक न लढता यावल रावेर विधानसभा मतदारसंघातून मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्याचा संकल्प त्यांनी केला असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असला तरी त्यांची तयारी आतापासून करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणूक प्रचारा वेळी कोणते मुद्दे असतील, कोणत्या व्युह्रचना आखल्या जातील याबाबतची ब्लू प्रिंट आमच्याकडे तयार असून त्याचा आताच उहापोह न करता योग्य वेळी ते जाहीर करण्याची त्यांची योजना आहे. २०१९ च्या निवडणुकीत लोकसभेची निवडणूक त्यांना लढवायची होती. तशी त्यांनी आपली इच्छा व्यक्तही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांची बोलणी सुद्धा झाली होती. तथापि ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी गेले चार वर्षे लोकसभा अथवा विधानसभा निवडणूकीची कधी वाचता केले नाही. परंतु आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात आपल्या मनातील इच्छा प्रकट केली.

श्रीराम पाटील हे मूळचे बोदवड तालुक्यातील निमखेडी येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले असले तरी गेल्या ३५-४० वर्षापासून रावेर येथे वास्तव्याला आहेत. त्यांचा जन्म जरी बोदवड तालुक्यातील निमखेडीचा असला तरी खऱ्या अर्थाने त्यांची कार्यभूमी ही रावेर आहे. रावेरमध्येच त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर रावेरमधून आपल्या गॅरेजच्या व्यवसायाला सुरुवात करून बजाज सारख्या कंपनीच्या टू व्हीलर गाड्यांची एजन्सी घेतली. या व्यवसायाचा विस्तार करता करता त्यांनी ठिबक सिंचनच्या उत्पादनात प्रवेश करून जळगाव सह सुमारे नऊ जिल्ह्यात आपले ठिबक मध्ये नावालौकीक प्राप्त केले. ठिबकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा आणि ठिबक उद्योगातून रोजगार निर्मिती करून रावेर व परिसरातील तरुणांना नोकऱ्या ते देऊ शकले. त्यानंतर त्यांनी काळाची पावले ओळखून इलेक्ट्रॉनिकवर चालणाऱ्या ‘सिका’ या बाईकची निर्मिती करून ऑटोमोबाईल बाईक निर्मिती उद्योगात भरारी घेतली. एका शेतकऱ्याच्या मुलाने छोटासा उद्योग सुरू करून एक आदर्श निर्माण केला. उद्योगाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी पाऊल टाकले असून त्यांची शैक्षणिक संस्थाही आहे. आपला व्यवसाय नावारूपाला आणल्यानंतर, व्यवसायात स्थिरता आल्यानंतर आता यावल रावेर तालुक्याच्या विकासासाठी तसेच ‘यावल रावेर तालुक्यातील जनतेचे आपणही काही देणे लागतो’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या माध्यमातून शासनात प्रवेश करून जनतेची सेवा अधिक जोमाने करण्यासाठी आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही राजकीय पक्षाशी त्यांची बांधिलकी नाही, अथवा कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांचा विरोध नाही. म्हणून विधानसभा निवडणूक स्वबळावर अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढविणे आणि त्यानंतर जिंकून येणे आजकाल फार अवघड आणि जिकरीचे बनले आहे. त्यासाठी सक्रिय व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा गोतावळा असणे आवश्यक तर आहेच, परंतु साम-दाम-दंड या नीतीचा होणारा निवडणूक प्रचारातील प्रकार अत्यंत घातक ठरलेला आहे. तेव्हा निवडणूक लढवण्याचा संकल्प करणाऱ्या श्रीराम पाटलांना याची कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही. पण तरीसुद्धा उद्योजक श्रीराम पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने त्यांनी ताक सुद्धा फुंकून प्यायला पाहिजे. ते स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी झाले आहेत. ग्रामीण भागातील हे उद्योजक अनेक खच खळगे पार करून या थराला पोहोचले आहेत. त्यामुळे प्रत्येक बारकावे यांची त्यांना कल्पना असल्याने ते निवडणुकीचे मैदानही लिलया पार करू शकतील. ते एका विशिष्ठ जातीचे असले तरी, जात धर्म मानणारे नाहीत. सर्व जाती धर्मातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. थोडक्यात अजातशत्रू ही उपमा त्यांना देता येईल. त्यामुळे दीन, दलीत, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि सर्व प्रेम करणाऱ्या जनतेला ते स्वतःची प्रॉपर्टी समजतात. माझ्या सोबत मिळून काम करणाऱ्यांना मी कार्यकर्ता नाही तर माझे सहकारी समजतो. त्यामुळे त्यांच्या प्रेमाच्या जोरावर आपण जिंकणारच, असा आत्मविश्वास त्यांना आहे. असं हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व यावल रावेर विधानसभा निवडणुकीच्या मैदानावर असल्याने प्रतीस्पर्धींमध्ये निश्चितच एक खंबीर स्पर्धकांशी सामना करणार करावा लागणार असल्याने त्या दृष्टीने त्यांनाही आपली व्यूहरचना करावी लागणार आहे. उद्योजक श्रीराम पाटलांचा या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.