श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग-33

 त्यांचे दास्यत्व करीन

 

बोले तैसा चाले I

त्याचीं वंदीन पाऊलें II1II

अंगे झाडीन अंगण I

त्यांचे दास्यत्व करीन II ध्रु II

त्याचा होईल किंकर I

उभा ठाकेन जोडूनि कर II2II

तुका म्हणे देव I

त्याचे चरणीं माझा भाव II3II

 

अभंग क्रमांक ४२९३

 

मनुष्यत्व मुमुक्षत्व  व महापुरुषाचा आश्रय या तिन्ही गोष्टी दुर्लभ असतात असे वचनच आहे.  पण वेळ पाळणे, शब्द पाळणे व एका जागी स्थिर बसणे या तिन्ही गोष्टी अतिशय अवघड आहे ही आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. अलीकडच्या काळात तर या अशक्यप्राय झाल्या आहेत. रस्त्यावर गर्दी इतकी असते की कितीही वेळ सांभाळू असे वाटले तरी इच्छित स्थळी आपण पोहोचु शकू असे नाही. शब्द पाळणे  हे तर अप्राप्यच.  त्यामुळे आम्ही कोणाच्या मध्ये पडत नाही. आपण बरे आपलं काम बरे असाच पवित्र असतो. कोणी कोणाला काही सांगायला जात नाही कोणी ऐकायला तयार नसतो. शब्दांची देवाण-घेवाणच संपते व हा उचित शिष्टाचारात जमा होतो. पण अधिक काही  न बोलणेच  हितावह ठरते.

आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्र एकवचनी, एकबाणी होते. केवळ वचनासाठी ते चौदा  वर्षे वनवासात गेले. भिल्लीण शबरी हे रामचंद्र येतील याची वाट पाहत राहिले ती श्रद्धेने वाट पाहत राहिली व त्याचे फळ तिला मिळाले हे अनेक श्रेष्ठ भक्त हे चिरंजीव ठरले ते शब्द किंवा वचन पालन केले म्हणूनच अनेक समर्थ स्त्रियांनी शिष्याने गुरु आज्ञा पालन केले व तेही सद्गुरु पदावर आरोप झाले. “नर करणी करेल तो नर का नारायण बन जाए” एवढे मोठे आव्हान आपणही घेऊ शकतो पण यासाठी वेळेचे तंतोतंत भान ठेवणे संत वचनाचा अभ्यास करून आचरण तसे करणे, एकमेकांना दिलेला शब्द जास्तीत जास्त पालन करणे व एका ठायी बसून आवडीने नामस्मरण ध्यान आधी साधना करणे हा एक उत्तम मार्ग आहे.

इतिहासात अनेक दाखले आढळतात. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ इतके ते प्रसिद्ध आहेत. ‘आधी लगीन कोंढाण्याचा’, ‘हे राज्य व्हावे हे तो श्री ची इच्छा’, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, ‘हे माय भू तुझे मी फेडील पांग सारे’ कितीतरी महापुरुषांची चरित्रे वचन पूर्ततेची साक्ष देतात.

रामदास स्वामींही आपल्या आईला येऊन प्रत्यक्ष भेटले. रामाचे दर्शन तिला घडवले. साधनेसाठी बाहेर पडल्यावर विशिष्ट काळाने आपल्या मातेला अनेक संतांनी दर्शन दिले. संतांची चरित्रे ही त्यांच्या साधने विषयी किती प्रामाणिक होते याची प्रत्यय आपल्याला पुन्हा पुन्हा देतात. बारा, बारा आणि बारा म्हणजे छत्तीस वर्षे ,तीन तप त्यांनी गुरुने जो शब्द दिला त्याचे पालन करून विशिष्ट वेळी उपासना केली. रामदास स्वामी यांनी टाकळी येथे बारा वर्षे पाण्यात उभे राहून गायत्री मंत्र पुरुश्चरण व श्रीरामजयरामजयजयराम या त्रयोदक्षशी मंत्राचा जप केला म्हणून ‘समर्थ’ या पदवीला ते पोहोचले. पावसला स्वामी स्वरूपानंद यांनीही अशीच साधना वर्षानुवर्ष केली. अंतरात संन्निध असलेल्या गोविंदाचे शांत बसूनच दर्शन घेतले व सद्गुरु चरण उपासीत आपले जीवन कृतार्थ केले. ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोंदवले येथे फक्त नामाचाच व्यवहार केला. “जयाचा जन्म जगी नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला” असेच त्यांचे चरित्र राहिले.

तुकोबारायांच्या गाथेत किंकर होऊन राहील. दारात भिकारी बनून राहील, याचक म्हणून राहील किंबहुना कुत्रा म्हणून राहील, संताच्या दारात नुसते पडून राहिलं असा भाव अनेक अभंगात दिसतो. “तुका म्हणे करून दावी I त्याची पाऊले माझ्या जीवी I” ‘करून दाखवणे’ म्हणजेच बोलतो तसे वागणारा अशा भक्तांची मी दास्यभावाने सेवा करतच राहील. त्यांचे अंगण ही झाडेल. ते कसे तर सर्व देहाने लोटांगण घालूनच. शिवाय काया-वाचा-मन याने पूर्ण शरणागत असेल. त्यातच मी स्वतःला धन्य मानेल.

अविनाशी पद फक्त भगवंताचे आहे. त्याच्या चरणाशीच खरं सुख आहे. बाकी सारे दुःखाचे मूळ आहे. अदि अंती एक गोविंदच सत्य आहे. एक दिवस देह तर जाणार आहे मग काय मागे उरणार ?तर फक्त कीर्तिच. म्हणून मला जे भक्त आहेत भगवंताचे दास आहेत त्यांच्या चरणाशीच माझा भाव आहे.”नम्र झाला भूतां तेणे कोंडिले अनंता” म्हणून पृथ्वीतलावर जे भक्त आहेत, दास आहेत त्यामुळेच पृथ्वी सनाथ होते. ते भूषण ठरतात. म्हणून तर नामदेव महाराजही म्हणतात,” कल्पनेची बाधा न हो कोणे काळी I ही भक्तमंडळी सुखी असो I ” संत मंडळी, हरीचे दास सर्वच सुखरूप राहोत अशी ते देवाजवळ प्रार्थना करतात, मागणी मागतात. दासपणाचे सुखसोहळे मला अनुभव देत असे कलावती आईही प्रार्थना करतात. गिरीधराला त्या अनन्य भावे शरण जातात.” किती दास ते तापसी I तीर्थीवासी गिरीकंदरी भेटी नाही जयासी I” अशा असंख्य दासांची आठवण काढून रामदास स्वामीही विस्मित होतात.

तुकाराम महाराज तर या भक्तांच्या, दासांच्या द्वारात हात जोडून, दोन्ही कर एकमेकांवर ठेवून उभे राहतात जसे हनुमान प्रभू रामचंद्राच्या पुढे उभ्या असतात अगदी तसेच कारण हा विश्वंभर दासांचे दास्य करण्यासाठी धावून येतो. तो कृपेचा सागर आहे. कटेवर हात ठेवून उभा आहे पण उदार होऊन भक्तांसाठी प्रकट होतो. भक्तांचे भूषण होऊन तो राहिला आहे. त्याला शीण किंवा कंटाळा नाही. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य त्यांनी केले. इतका तो दासाचा अंकित आहे. जेथे हरिदासांची वस्ती आहे तिथे फक्त पुण्य पिकते व पापाचा नाश होतो. प्रत्यक्ष नारायण सुदर्शन घेऊन फिरत असतात म्हणून तर म्हणतात,” हरीच्या दासा चिंता,हे तो अघटित  वार्ता, खावे,प्यावे, ल्यावे तुका म्हणे पुरवावे” सर्वच काळ या दासाला अनुकूल असतो. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रही आपल्या दासांच्या मागे उभे राहतात. अशा अनेक दासांच्या भक्तांच्या विषयी आपल्यालाही सप्रेम भाव असावा.

श्रीकृष्ण शरणं मम् 🙏

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे 

              कोथरूड , पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.