तमिळनाडूत एक्सप्रेसला भीषण आग; 8 प्रवाशांचा मृत्यू, 25 जखमी (व्हिडीओ)

0

तमिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तमिळनाडूमधील मदुराई येथे प्रवासी रेल्वेला भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या पुनालूर-रामेश्वर एक्सप्रेसला (Punalur-Madurai Express) ही आग लागली असून या आगीत 8  प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर  25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले  आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या पुनालूरहून रामेश्वरकडे निघालेल्या प्रवासी रेल्वेला आज शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी आग लागली. ही ट्रेन मदुराई रेल्वे स्थानकाजवळ थांबलेली असताना पर्यटकांच्या एका बोगीने अचानक पेट घेतला. क्षणातच  अग्नितांडव होऊन संपूर्ण बोगी कवेत घेतल्याने अनेक प्रवाशांना बाहेरही पडता आले नाही. या आगीमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

दरम्यान सकाळच्या सुमारास रेल्वेच्या एका बोगीला आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण बोगीला वेढा घातला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात संपूर्ण बोगी जळून खाक होताना दिसतेय.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेली बोगी खासगी होती. ही बोगी नागरकोईल जंक्शनजवळ टूरिस्ट ट्रेनला जोडण्यात आली होती. या बोगीतून प्रवास करणारे प्रवासी अवैधरित्या गॅस सिलिंडर घेऊन जात होते. गॅस गळती झाल्याने बोगीला आग लागली. या बोगीव्यतिरिक्त इतर कोणत्याही बोगीचे आगीमुळे नुकसान झालेले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट असून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, दक्षिण रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची तात्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.