जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. स्वतःसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. एक वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार घेऊन शिवसेनेची बंद केले आणि शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यानंतर खरी शिवसेना आमचीच, पक्षाचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण सुद्धा शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेले हे दुसरे बंड होय. शिंदे फडणवीस सरकारकडे पूर्ण बहुमत असताना भाजपने राष्ट्रवादी पक्षाला सरकारमध्ये का सामील केले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असला तरी, भाजपची या मागची असलेली स्ट्रॅटेजी मात्र वेगळी असावी. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सामील करून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. एक म्हणजे राष्ट्रवादीत फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील शक्यता कमी केली. दुसरे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने भाजपवर दबाव टाकत होते त्यांची सभेतील किंमत कमी केली किंवा त्यांच्याच वाढत्या महत्वकांक्षेला रोखले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांची डोकेदुखी आणखी वाढली. शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार म्हणून बातम्या प्रसारित होत असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. जळगाव जिल्ह्यातून पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील तसेच, पाचोर्‍याचे किशोर आप्पा पाटील आमदार किशोर आप्पा पाटील यांची मंत्री पदी वर्णी लागावी म्हणून खटाटोप चालू होता. हे दोघेही आमदार मुंबईमध्येच तळ ठोकून बसले होते. परंतु दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन शपथविधी पार पडला. आता मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला असला तरी शिवसेना व भाजपच्या किती आमदारांना स्थान मिळेल हे विस्तारानंतरच कळेल. तथापि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची मात्र घोर निराशा झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजपचा एक आणि शिवसेनेचा एक असे दोन मंत्री असताना शिवसेनेच्या रूपाने तिसरा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने अंमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी जिल्ह्याला मंत्रिपद दिल्याने जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना आता मंत्रिपद मिळण्याची आशा पूर्णपणे मावळली आहे. उलट जिल्ह्यातील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे असे एक एक मंत्री असल्याने शिवसेनेच्या आमदारांची मात्र कोंडी झाली आहे.

 

राष्ट्रवादी नेते अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, अर्थ खात्याचे मंत्री असताना निधी देण्यात भेदभाव केला. म्हणून अजित पवारांच्या नावाने खडे फोडून त्या सरकार म्हणून शिंदे गट बाहेर पडला. आता तेच अजित पवार शिंदे फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री बनले आहेत. आता सत्ता वाटपावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वादळ उठल्याचे दिसून येते. अर्थ, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महसूल ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नये, अशी मागणी करताय. म्हणजे खातेवाटपा आधीच शिवसेना आमदारांमध्ये धूसफूस सुरू झाली आहे. प्रत्यक्षात सत्ता वाटपानंतर आणखी नाराजी वाढेल यात शंका नाही. शिंदे फडणवीस सरकारकडे पूर्ण बहुमत असताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सामील केल्याबद्दल शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेचे प्रतोद आणि मंत्रिपदाचे दावेदार असलेले आमदार भरत गोगावले यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली. एका भाकरीतून अर्ध्या भाकरी शिवसेनेला मिळत होती. आता पाव भाकरीवर समाधान मानावे लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पात्र आमदार शिवसेनेचे असून त्यापैकी गुलाबराव पाटील मंत्री आहेत. जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील पालकमंत्री असून आता पालकमंत्री बदलाच्या हालचाली सुद्धा सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद मिळाले असून अनिल पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे अनिल पाटलांचा अजित पवारांकडे पालकमंत्री करण्याबाबत आग्रह राहील असे कळते. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही मंत्रीपदाचे महत्त्व कमी होईल यात शंका नाही. त्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे अनुभवी मंत्री असून त्यांना सुद्धा पालकमंत्री पद मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होईल. त्यात शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदारांची मात्र कोंडी होईल यात शंका नाही. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.