जळगावला योग्य नेतृत्वाची गरज

0

 

लोकशाही संपादकीय लेख;

 

जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी जळगावला योग्य नेतृत्व अभावी त्याची पीछेहाट झाली आहे, अशी खंत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. १९८० ते २००० च्या कालावधीत जळगाव शहराचा झपाट्याने विकास झाला. हे सांगताना सुरेश दादा म्हणाले, माझ्या नेतृत्वात योग्य टीम कार्यरत होती. परंतु २००० नंतर मात्र जळगाव शहराच्या विकासाला ओहोटी लागली. राजकारणाच्या साठमारीत एकमेकांचे पाय खेचण्यात राजकीय नेत्यांची शक्ती वाया गेली. या सुरेश दादांच्या म्हणण्यात तथ्य आहे. राजकीय नेतृत्वाच्या चढाओढीत शहराचा बट्ट्याबोळ झाला हे खरे आहे. नगरपालिकेची १७ मधली प्रशासकीय इमारत असलेले जळगाव शहर हे देशातील पहिले शहर होते. नगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढवून शहरवासीयांसाठी विकास प्रकल्प उभी करणारी नगरपालिका म्हणून जळगाव शहराकडे पाहिले जात होते. नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून शहरातील व्यापार उद्दीम वाढीबरोबरच पालिकेचे उत्पन्न वाढीची संकल्पना पाहणीसाठी आणि अभ्यासासाठी देशातील इतर अनेक नगरपालिकांच्या शिष्टमंळाची जणू रिघ लागलेली होती. आगामी ५० वर्षाच्या लोकसंख्या वाढीसाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जळगाव नगरपालिकेचा आदर्श अनेक नगरपालिकांनी घेतला. शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता आणि विजेच्या व्यवस्थेचे नियोजन केले गेले. स्वच्छ सुंदर शहराची संकल्पना राबविण्याचा प्रश्न प्रयत्न केला गेला. झोपडपट्टीयुक्त जळगाव शहराची संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पक्की घरकुले देण्याचा प्रयत्न झाला. पक्की घरकुले दिलीही गेली. राहिलेल्यांना पक्की घरकुले देण्याच्या प्रयत्नाला राजकीय मंडळींनी खोडा घातला आणि सुरेश दादांचे नेतृत्व संपविण्याचा घाट घातला. त्यामुळे सुरेश दादा हताश झाले आणि घाणेरड्या राजकारणापासून दूर गेले. आता ज्यांनी सुरेश दादा जैन यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांना राजकीय षड्यंत्रात गोवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांना पश्चाताप होतोय. गेल्या वीस वर्षात जळगाव शहर विकासापासून दूर फेकले गेले. शहरवासियांची कुटुंबना झाली. जळगाव शहरासाठी सुरेश दादा जैन यांचे नेतृत्व योग्य होते, असे आता त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा म्हणायला लागले आहेत. राजकारणात ‘सुक्या बरोबर ओलेही जळते’ असे म्हणतात ते खोटे नाही. सुरेश दादा जैन आता स्वतः खंत व्यक्त करतात. जळगावला योग्य राजकीय नेतृत्वाची गरज आहे. त्यांना आता स्वतःला नेतृत्वाची अपेक्षा नाही. त्याचबरोबर विद्यमान राजकीय परिस्थिती बाबतही ते समाधानी नाही. स्वतःची मुले व्यवसायात असल्याने ते राजकारणात येणार नाहीत, हेही त्यांनी स्पष्ट करून टाकले.

४०-५० वर्षांपूर्वी जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद हे तिन्ही जिल्हे सर्व दृष्टीने एक सारखे होते. परंतु ४० ते ५० वर्षाच्या कालावधीत आज नाशिक आणि औरंगाबाद हे शहर जळगाव पेक्षा कितीतरी पटीने विकसित झालेले आहेत. नावारुपाला आले आहेत. नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात उद्योगधंदे झपाट्याने वाढले. शिक्षणाची दालने मोठ्या प्रमाणात उभी राहिली. रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या, दळणवळण वाढले, आयात निर्यात वाढली. जळगावचे तरुण रोजगाराच्या शोधात नाशिक, औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत. जळगाव जिल्ह्यात काय कमी आहे? चांगली सुपीक शेत जमीन आहे, तापी गिरणा या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, केळी, कापूस, ऊस आणि सोयाबीन सारखी नगदी पिके उत्पादित होतात. मेहनत करणारा शेतकरी तसेच तरुण वर्ग आहे. उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. मग जळगाव जिल्हा मागे का? इच्छाशक्ती असलेल्या राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे, असे म्हणता येणार नाही. कारण एकट्या जळगाव जिल्ह्यासाठी तीन महत्त्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. सर्व मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या खास मर्जीतले आहेत. त्यामुळे योग्य राजकीय नेतृत्वाचा अभाव म्हणता येणार नाही. त्यांच्याकडून कामे करून घेण्याची इच्छाशक्ती असणे मात्र आवश्यक आहे. स्वतंत्र प्राप्तीनंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदा २५ ते ३० वर्षात महाराष्ट्रात विशेषतः जळगाव जिल्ह्यात बाळासाहेब चौधरी, के एम बापू पाटील आणि प्रतिभाताई पाटील असे प्रभावी मंत्री लाभले होते. त्यांच्या काळात जळगाव जिल्ह्यात पायाभूत विकासाची कामे झाली. ती नेत्रदीपक अशी आहेत. योग्य राजकीय नेतृत्वाबरोबरच जनतेची इच्छाशक्ती सुद्धा तितकी महत्त्वाची आहे. ती इच्छाशक्ती महत्त्वाची असण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणतात. जनतेने राजकीय नेत्यावर सवाल अवलंबून न राहता आपला विकास स्वतः करण्याची इच्छाशक्ती ठेवली, तर नजीकच्या काळात जळगाव जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, असे आयुष्य प्रसाद यांचे म्हणणे योग्यच आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.