पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आता आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. यंदा बेहतर मान्सून महाराष्ट्रात येणार अशा बातम्या महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला होता, परंतु बीपरजॉय सारखे वादळ गुजरात मध्ये आले आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा पाऊस लांबणीच्या दिशेने गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी हिसकवून घेतले. गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पावसाच्या संदर्भात ब्रेकिंग बातम्या व्हायरल होतात. ‘आता महाराष्ट्रासाठी ब्रेकिंग बातमी, दमदार पाऊस पडणार…’, ‘मुसळधार पावसाची हजेरी लवकरच..’ परंतु या ब्रेकिंग बातम्या आणि हवामान खात्याचा अंदाज नेहमीप्रमाणे फोल ठरत आहे. आज शुक्रवार दिनांक 22 जून रोजी हा अग्रलेख लिहित असेपर्यंत तरी जळगाव जिल्ह्यात पाऊस नव्हता. गेल्या दोन-चार दिवसांपासून दिवसभर आकाशात ढग दाटलेले आहेत. संध्याकाळी थोडे वादळ होते. आता पाऊस पडेल असे वाटत असताना आकाश पुन्हा निरभ्र होते आणि पुन्हा रात्री गरम हवा चालू होते. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात निम्मा कापूस विक्री अभावी पडून असताना पुन्हा कापसाची पेरणी करण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहतोय. जमिनीची मशागत करून तो पेरणीसाठी सज्ज झालाय, पण पाऊस मात्र हुलकावणी देत आहे. दमदार पाऊस झाल्याशिवाय खरिपाच्या पेरण्या करू नये, असे वारंवार शासनाच्या कृषी विभागाकडून सूचना दिल्या जात असताना सुद्धा पिकाचे उत्पन्न चांगले मिळेल या आशेने उडीद, मूग आदी पिकांची काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी सुद्धा केली. रोहिणी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने धूळपेरणी केलेले बियाणे आता क्रीडा मुंग्यांनी खाऊन टाकल्यामुळे बियाणे वाया जाईल. धूळपेरणीचे बियाणे वाया जाण्याचे संकट धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या माथी येणार आहे. तो भुर्दंड सहन करून पाऊस पडल्यावर नवीन बियाणे खरेदी करून पुन्हा पेरणी करावी लागणार असून निसर्गाच्या या दृष्ट चक्रातून शेतकऱ्यांची सुटका होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण घटण्याऐवजी वाढत आहे. कालचीच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील 42 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी योगेश भास्कर वाघे यांनी शेतात झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. संपूर्ण वाघे परिवार आता उघड्यावर पडले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातल्या हृदयद्रावक घटना थांबत नाहीत. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना हवी असेल तर सिंचनाच्या सोयी वाढवणे हा एकमेव पर्याय होय. पण शेतकऱ्यांच्या नावाचा जयघोष करणारे शासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे…

रोहिणी मृग नक्षत्र कोरडे गेले आता आर्द्रा नक्षत्रातही पावसाने ओढ धरली तरी खरीपाच्या उशिरा होणाऱ्या पेरण्यामुळे उत्पादन घटणार हे मात्र निश्चित आहे. म्हणजेच खरिपाच्या प्रत्येक पेरणीचा उत्पादन खर्च मात्र वाढणार आणि वाढत्या उत्पादन खर्चानुसार उत्पन्न कमी आल्याने त्यातच शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला कमी भाव मिळाल्याने शेतकरी हैराण होणार.. शेतकऱ्यांचे विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र पूर्णतः बिघडते. तो आपल्या कुटुंबाचे गुजराण करतांना मेटाकुटीस येतो. त्यातूनच आत्महत्येचा मार्ग तो अवलंबतो. त्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांच्या उत्पादन मालावर मालाला भाव मिळाला पाहिजे, ही रास्त मागणी. सर्वजण त्याला तत्वता मान्यता देतात, परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नाही. हा विषय सविस्तर चर्चा करायचा म्हटले तर रकानेच्या रकाने भरले जातील. थोडक्यात हा विषय मांडणे शक्य नाही. पाऊस लांबला की शेतकऱ्यांकडे अनेक समस्या निर्माण होतात. सध्या पाऊस लांबल्याने अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात येते. पिकाच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे विहिरीतील पाणी शेतकऱ्यांसाठी अपुरे पडते. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रार्थना करूया…!

Leave A Reply

Your email address will not be published.