मविआच्या उमेदवारी विलंबामुळे जिल्ह्यातील प्रचारात शांतता…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

देशातील १८ व्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले. एकूण पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. ऐन कडक उन्हाळ्यात १३ मे ला होणाऱ्या मतदानाची टक्केवारी घटू नये याची काळजी घेतांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची तसेच प्रशासनाची दमछाक होणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग तसेच स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असताना, उन्हाचा फटका त्यांच्या प्रयत्नातील अडथळा ठरू नये, एवढीच अपेक्षा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा जोरदारपणे कामाला लागली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. दरम्यान जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी महायुती अर्थात भाजपतर्फे दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले असले, तरी अद्याप महाविकास आघाडी या प्रमुख विरोधी पक्षाच्या वतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. जळगाव लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्यानुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली आहे. तर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविणार आहे. दोन्ही ठिकाणचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षातर्फे उमेदवारीचा शोध सुरू आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात अद्याप प्रचाराला वेग आलेला नाही. भाजपतर्फे दोन्ही ठिकाणचे उमेदवारांपैकी जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदाराच्या तसेच पक्षात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. १ एप्रिल नंतरच खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत येईल. तथापि अद्याप तरी जिल्हाभरात प्रचारात शांतता दिसून येत आहे. महाविकास आघाडीतर्फे दोन्ही ठिकाणी उमेदवारी कोणाला मिळेल, याकडे महायुती अर्थात भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडी उमेदवारांची नावे पाहून कदाचित भाजप सुद्धा उमेदवार बदलू शकतात, अशी जिल्हाभरात चर्चा आहे. त्यामुळे सुद्धा प्रचार प्रचारात शांतता आहे म्हटले तरी वावगे ठरू नये.

 

आतापर्यंत निवडणूक प्रचाराचा विचार केला तर भाजपतर्फे प्रचारात आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघातील प्रचाराच्या प्रमुख रचने संदर्भात व्यूहरचने संदर्भात जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मतदार संघ निहाय बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. आपल्या समर्थक उमेदवाराला उमेदवारी मिळाली नसल्याने रावेर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची नाराजी जाहीरपणे दिसून येत आहे. गुप्त बैठकीतील चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने रावेर मतदार संघातील भाजप कार्यकर्ते आणि खुद्द उमेदवार रक्षा खडसे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. जिल्हाभरात भाजपमध्ये सर्वकाही अल्बेल नसल्याचे दर्शविणारा हा व्हिडिओ म्हणावा लागेल. २०१९ च्या निवडणुकीत विद्यमान भाजपचे तत्कालीन खासदार ए.टी. नाना पाटील यांच्या संदर्भात घडले. दोन टर्म खासदार राहिलेल्या ए.टी. नाना पाटलांची उमेदवारी कापली गेली, हा इतिहास आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल होईपर्यंत काय घडू शकते हे छातीठोकपणे कोणी सांगू शकत नाही. तसेच २०१९ च्या आताच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जवळपास १०० गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रचार सुद्धा केला होता. पण ऐनवेळी त्यांची उमेदवारी बदलली गेली. असो महाविकास आघाडीची उमेदवारांची नावे लवकरच घोषित व्हावी, हीच अपेक्षा.. मविआने उमेदवारी जाहीर करण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला तर त्याचा सुद्धा प्रचारावर विपरीत परिणाम होऊ शकतो…!

Leave A Reply

Your email address will not be published.