तुका आकाशाएवढा

0

तुकाराम बीज विशेष लेख 

सर्वसामान्य व्यक्तीं सारखे, चार चौघांसारखे संसारात लाभ हानी स्वीकारणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय वयाच्या एकविसाव्या वर्षी भक्तिमार्गाकडे वळले व वयाच्या  सत्तेचाळीसाव्या वर्षी सदेह वैकुंठवासी झाले. म्हणजे त्यांचा पारमार्थिक संवेग किती तीव्र होता याची खरोखरच कमाल वाटते. त्यांनी ‘देव’ आपलासा करून घेतला व अंधश्रद्धा, अज्ञान, दांभिकता यावर आपल्या गाथेतून निषेध नोंदविला व भक्तीचे मर्म समजून, प्रपंचात राहून नामस्मरणाचा व ध्यानाचा अभ्यास करा असा उपदेशही केला. त्यामुळे या जगत्  वंद्य  जगद्गुरु असलेल्या महान संतापुढे नतमस्तक होण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय राहतच नाही. आज फाल्गुन कृष्ण द्वादशी  सत्ताविस मार्च ‘तुकाराम बीज’. निमित्त महाराजांना त्रिवार वंदन व त्यांच्या केवळ दोन अभंगांचे प्रकट चिंतन.

आपल्या सुंदर  वास्तुत  अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपण संग्रहित ठेवतो. आपली ती स्वाभाविक इच्छा असते. तसेच एक ‘तुकारामांची अभंग गाथा’ आपल्या  वास्तुत आवर्जून हवी. त्यातील एक अभंग तरी आपण वाचावा, समजून घ्यावा. त्यावर चिंतन करावे त्यातून जो लाभ होईल तो अलभ्य  असा असणार आहे. कारण,

“करितो कवित्व म्हणाल कोणी”

“नव्हे  माझी वाणी पदरीचीI”

“माझिया युक्तीचा नव्हे हा प्रकार”

“मज विश्वंभर बोलवितो I”

प्रत्यक्ष विश्वंभरच बोलतोय अशी प्रामाणिक व प्रांजल कबुली संत तुकाराम महाराज यांनी दिली. त्यांच्या वाणीतून जे शब्द आकाराला आले ते केवळ अभंग म्हणून नाही तर त्रिकाल बाधित सत्य ठरले. प्रत्येक अभंग हा तर्कशुद्ध, शास्त्रशुद्ध, प्रामाणिक आत्मपरीक्षणातून साकार झालेला आहे. एखादी विज्ञानाची प्रयोग वही पाहिली तर त्यात प्रयोग असतो. प्रात्यक्षिक, साहित्य, कृती व नंतर अनुमान निघते. अगदी या सर्व स्तरावर तुकारामांचे अभंग आपण पडताळून पाहू शकतो कारण त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग केलेला आहे. भक्ती मार्गावर चालता चालता त्यांनी जे साधन केले ते अतिशय निष्ठेने, श्रद्धेने व शुद्ध हेतू ठेवूनच. गाथेतील मंगला चरणातील पहिलाच अभंग असा आहे.

” समचरण दृष्टी विटेवरी साजरी”

“तेथे माझी वृत्ती राहो I” “आणिक न लगे मायिक पदार्थ” 

“तेथे माझे आर्त नको देवा I”

पंढरीनाथांना तुकोबाराय  विनवणी करीत आहेत की माझी व्यथा, काळजी, चिंता याचा भार मला नको. माझा भाव तुझ्या समचरणावर एकनिष्ठ  राहू दे.  चातक जसा आपली चोच उघडी ठेवून पाण्याचा वर्षाव कधी होईल याचीच वाट पहात राहतो.मेघातून वृष्टी होईल तेव्हाच तो जल घेतो किंवा धेनु जशी आपल्या बालकालाच  जवळ करते. सूर्यविकाशीनी चंद्रामृताची वाट पाहत नाही. पाण्याला जाणारी गुजरी  हंड्याकडे लक्ष ठेवून रोज पाणी आणते. तसेच पंढरीराया माझे मन तुझ्या चरणा जवळच राहो अन्य कशाचीही अभिलाषा न करो.

याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक संतश्रेष्ठ तुकोबारायांनी केले. भगवंताचे नाम व ध्यान त्यांनी प्राणाबरोबर सांभाळले. याशिवाय एकादशी व्रत करणे, संतांचे अभंग विश्वासाने पाठ करणे, सदाचरण करणे, परनिंदा न करणे, परस्त्री अभिलाषा व परद्रव्य अभिलाषा तिन्ही गोष्टी सर्वथैव त्याज्य म्हणून कटाक्षाने सांभाळल्या व त्यांची वृत्ती समचरणावर विठुरायाच्या कायमच राहिली व यातूनच त्यांनी अवलोकन केले व सहज ध्यानात आले की पंढरीनाथ आता प्रेमाने आपलासा झाला आहे तो जगाचा नियंता  आहे.  दयाळू आहे. भक्ताचे कोड पुरविणारा आहे व कळी काळालाही धाक दाखवणारा आहे. जन्मोजन्मीचे पुण्य फळास आले व लाभ झाला. निखळ  सुख,  आनंद, समाधान हे प्रपंचात कमी अनुभवण्यास येते. ते केवळ विठूचरणाशीच संभवते.

इथ मूल्यांकन होते ते ‘शुद्ध सात्विक भावाचे’ अनेक वेळा तुकोबा राय म्हणतात, येथे भाव प्रमाण आहे बाकी सारे गौण आहे. गाथा वाचताना भाव ठेवूनच वाचायला हवी तरच त्यातील स्पंदन आपण तरल मनात टिपू शकतो व स्वीकारू शकू. गाथेतील प्रत्येक अभंग आपल्याला जवळचा वाटेल कारण प्रत्येक अभंग “स्वप्रचितीचा आहे. “बोलू ऐसे बोल I जेणे बोले विठ्ठल डोलेI” जणू प्रत्येक अभंगाला विठुरायाने मान डोलावली आहे व प्रतिसाद दिलाय. ओतोप्रत भरून राहिलेले सावळे परब्रह्म जणू बोलत आहे.हे सारे अभंग म्हणजे देव भक्ताचा सुख संवाद आहे जणू गुजगोष्टी एकमेकांशी करत आहेत असे वाटते. इतकी ताकद व सामर्थ्य या अभंगात आहे.

प्रपंचाचे स्वरूप चिंता, व्यथा, काळजी असे असतेच. ‘रात्रंदिन आंम्हा युद्धाचा प्रसंग’ हे तर खरेच. पण दात येण्यापासून दात पडेपर्यंत हा प्रवास सुरूच असतो. कोणीही येथे अपवाद नसतो. म्हणून विठ्ठलाचा ध्यास घेतलेले तुकोबारायांना  वेगळी अनुभूती आली.  जीवनाची परिणीती सार्थकतेत झाली व अनुमान निघाले की,

“याचसाठी केला होता अट्टाहास” 

“शेवटचा दिवस गोड व्हावा” 

“आता निश्चिंतिने पावलो विसावा” 

“खुंटलिया धावा तृष्णेच्या”  

बोधाच्या प्रांतातील परमोच्च पद प्रकट करणारा व जनमानसाला अपेक्षित मार्गदर्शन करणारा हा पराकोटीचा स्वप्रचितीचा हा अभंग आहे. कर्म करण्याचे हातोटी व कौशल्य समजून घेऊन व भक्तीचे वर्म समजून घेऊन आपण उपासना केली तर आयुष्याच्या सायंकाळी शांती, तृप्ती, आनंद, कृतार्थता याची थोडी चुणूक आपणही अनुभवू शकु.

संतश्रेष्ठ तुकोबाराय या अभंगात स्पष्ट कबुली देतात, आता तृष्णा राहिली नाही. हवे-नको पण संपले. मन निश्चिंत आहे. दिवस खेळीमेळीत  चालले आहे आणि यासाठीच आम्ही आयुष्यभर प्रयत्न केला.  पण तो लाभ मात्र खचितच आम्हाला झाला.

अलीकडे आपल्याही वाचण्यात, ऐकण्यात, बोलण्यात येते की साठी नंतर मिळालेले आयुष्य ग्रेस गुणांसारखे असते ते विना तक्रार आनंदात घालवावे. पण यासाठी ‘आनंदाचा झरा’ आपल्या आतच आहे हे उमगावे लागते. तसा प्रयत्न तरुणपणापासून व्हावा लागतो. आपण शिक्षण, पद, पैसा, प्रतिष्ठा, लोकसंग्रह हे जसे कमावतो तसेच समाधान व आनंद कमवावेच लागतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुकोबारायांनी ‘आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी’ हे अनुभवले.

थोडा प्रयत्न आनंदनिर्भर होण्याचा आपण करूया. यासाठी गाथेतील एक अभंग चिंतन करून वर्तन करावा. “समजले आणि वर्तले  तेची एक भाग्यपुरुष जाहले” असे समर्थवचन आहेच. असे भाग्यपुरुष होण्याचा अभ्यास व्हावा. सर्व संतांचे आशीर्वाद व ताकद आपल्या पाठीशी आहे. तुकाराम बीज निमित्त आजही फार मोठा अवर्णनीय सोहळा देहूत संपन्न होतो. लाखोंचा भक्त समुदाय तेथे उपस्थित राहतो.

“येता निजधाम कोणी” “विठ्ठल विठ्ठल म्हणा वाणी” 

अतिशय तळमळीने व करूणेने व प्रेमळ अंत:करणाने संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्याला सांगून गेले. अशा कोणीतला आपणही एक होण्याचा प्रयत्न करूया. अतिशय प्रेमाने व लडिवाळपणे तुकोबाराय आपला सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही.

 

II जय जय विठोबा रखुमाई II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे 

            कोथरूड,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.