गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला सुरूवात होते. हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा हा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ ला (मंगळवारी) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. चला तर मग जाणून घेऊया.. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्व..

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त

यंदा देशात ९ एप्रिलला (मंगळवारी) गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाईल. या दिवशी घरोघरी गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिलला (सोमवारी) रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार आहे. ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी ९ एप्रिलला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होणार आहे. यंदा गुढीपाडव्याचा सण हा ९ एप्रिलला (मंगळवारी) साजरा होणार आहे. मंगळवारी ९ तारखेला सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते १० वाजून १७ मिनिटांपर्यंत पुजेचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकता.

गुढीपाडव्याचे महत्व

महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजी केली जाते. या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते. गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते. गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजे ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असे म्हटले जाते.हिंदू धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे या  सणाला विशेष महत्व आहे.

 

अशी करा गुढीची पूजा 

– गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे.

– स्वच्छ कपडे परिधान करून देवाची पूजा करून प्रार्थना करावी.

– ज्या जागेवर गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करावी. घर स्वच्छ करावे.

– गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी, घर फुलांच्या माळेने सजवावे.

– घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधावे.

– गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी स्वच्छ करून घ्यावी.

– त्यावर हळदी-कुंकू लावून घ्यावे. आता एका कलशावर हळदी-कुकंवाच्या मदतीने स्वास्तिक काढावे.

– त्यावर आता रेशमी कापड गुंडाळावे. त्यावर फुलांचा हार, साखरेची गाठी लावावी आणि कडुनिंबाचा पाला गुंडाळावा.

– त्यानंतर, हळदी-कुंकू,अक्षता वाहून गुढीची पूजा करावी. अगरबत्ती, धूप लावावे. त्यानंतर, नारळ फोडावा.

– गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

Leave A Reply

Your email address will not be published.