तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला !

दीपक केसरकरांची ठाकरेंवर टिका

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

‘‘खरे शिवसैनिक कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे, उगाच सांगता आमचा पक्ष चोरला अमुक केले तमुक केले. उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला,’’ अशी खोचक टीका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर महायुतीच्या मेळाव्यात केली.

ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केले. ‘‘मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जर्मनीला पाठवले. तेथे सरकारसोबत वाटाघाटी केल्यावर त्यांचे मंत्रिमंडळ महाराष्ट्र आले होते. त्यावेळी आम्ही एक करार केला. त्यामध्ये एका वर्षात चार लाख मुलांना जर्मनीला पाठवण्याचा हा करार केला आहे.

ज्यांना भारतात 35 हजार पगार मिळतो, त्यांना जर्मनीत साडेतीन लाख रुपये पगार मिळेल. तसेच जर्मनी सरकारने त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी सहा केंद्र तयार केली आहेत,’’ असे सांगत केसरकर यांनी, ‘‘याला महाराष्ट्राचे सरकार आणि महाराष्ट्र म्हणतात,’’ असे उद्गार काढले. तसेच ‘‘महाराष्ट्राचा अभिमान आम्हाला आहे, म्हणून आम्ही दिवस- रात्र काम करतोय, गद्दार म्हणून ऐकायला काम करत नाही,’’ असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. ‘‘खोके खोके म्हणायचे हे कोणीही सहन करणार नाही. आमची तीन-तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही,’’ असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता ठाकरे पिता-पुत्रांवर लगावला.

यावेळी शिवसेनेचे रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, भाजपचे संजीव नाईक या इच्छुकांसह शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे हे उपस्थित होते. त्यामुळे यापैकी एक जण उमेदवार असणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.