धरणगावच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी येत्या पंधरा दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे नेतृत्वात मंगळवारी केलेल्या आंदोलनातून धरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. धरणगाव शहर हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील एक प्रमुख शहर आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून धरणगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सध्या तेथे वीस ते पंचवीस दिवसानंतर नळाला पाणी येते. ते पाणी सुद्धा अशुद्ध असते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. धरणगाव शहरातील रस्त्यांची वाट लागलेली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. स्वच्छतेचे तीन तेरा झालेले आहेत. गटारी तुंबल्या आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ असून सुद्धा तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही. पंधरा ते वीस दिवसानंतर नळाला पाणी येते, तेही अशुद्ध असते. धरणगावकर नागरिकांचा संताप अनावर झालेला आहे. मोर्चे आंदोलनाची दखल घेतली जात नाही. त्यासाठी माजी पालकमंत्री तसेच पालकमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर हे आता प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. त्यांनी धरणगावकरांची समस्या सोडवण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टीमीटर दिला आहे. पंधरा दिवसात जर पाणी समस्या सुटली नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गुलाबराव देवकर धरणगावकरांच्या मदतीला धावून गेल्यामुळे धरणगावकर नागरिकांना बळ मिळाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘एक एप्रिल पासून धरणगावकरांना नियमितपणे दोन दिवसात पिण्याचे पाणी दिले जाईल’ असे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन पाळले गेले नाही. ऐन पावसाळ्यात सुद्धा वीस-पंचवीस दिवसांनी नळाला पाणी मिळते. त्यामुळे धरणगावकर नागरिक त्रस्त झाले आहेत. धरणगावकर नागरिकांच्या मदतीला राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर धावून गेले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव देवकरांची धरणगाव शहरातील समस्यांसाठी घेतलेली एन्ट्री महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘पालकमंत्री फक्त भाषण ठोकतात, कर्तव्य शून्य आहे’. नेमका याचा फायदा गुलाबराव देवकर घेत असतील तर त्यात वावगे काय…!

धरणगाव शहरातील प्रमुख पिण्याचे पाणी समस्येवरच शहरवासीयांच्या इतर समस्यांना सुद्धा देवकारांनी वाचा फोडण्याचे काम केले आहे. स्वतः पालकमंत्र्यांकडे पाणीपुरवठा व स्वच्छता खाते असताना या दोन्ही बाबतीत धरणगावकरांची कुचंबना होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा फायदा काय? असा  प्रश्न गुलाबराव देवाकारांनी विचारला आहे. सध्या नगरपालिका प्रशासक राजवर असल्याने धरणगावकर नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना समस्यांचे निवेदन देऊन त्यावर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाच्या मुद्यावर देवकरांनी हात घातला आहे. धरणगाव शहरातील पाणीपुरवठा निविदा नियमित रीतसर कायदेशीर नसेल तर त्याला पूर्णपणे अभ्यास करून निविदा बेकायदेशीर आढळल्यास कोर्टात जाऊन त्याला दात मागितली जाईल, असा इशारा सुद्धा देवकरांनी दिला आहे. आणि तो महत्त्वाचा आहे. कारण धरणगाव शहरातील पाणीपुरवठा संदर्भात ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे, ते संशयास्पद आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा कारभारावर रोख लावण्यासाठी हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. कालचे पाणीपुरवठा बाबतचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असले तरी त्याला सर्व राजकीय पक्षांची सहानुभूती आहे. कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकट्या राष्ट्रवादीचा नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जे भाषण केले होते, त्यावर लगेच दुसऱ्या दिवशी विविध मुद्द्यागणिक पलटवार केला होता. गुलाबराव देवकरांनी पालकमंत्र्यांवर केलेल्या पलटवाराची जोरदार चर्चा मतदार संघातच नव्हे, तर जिल्हाभरात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर कालचे धरणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराची जणू ही रंगीत तालीम सुरू झाली आहे. त्यातच भाजप आणि शिंदे शिवसेनेत जाहिरातबाजी वरून निर्माण झालेल्या मतभेदाबाबतही सर्वत्र चर्चा सुरू आहे. 2019 च्या निवडणुकीत गुलाबराव पाटलांच्या विरुद्ध भाजपमधून बंडखोरी करून निवडून आलेले चंद्रशेखर अत्तरदे यांचीच भाजप तर्फे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे, हे विशेष. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटलांना जळगाव ग्रामीण मतदार संघातून हलक्याने घेऊन चालणार नाही, एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.