शेतकऱ्यांच्या कापसाबाबत तोडगा काढा..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवारी जळगावला येत आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाला वर्ष पूर्ण झाले. विविध कार्यक्रमांचा धडाका या दोन्ही शासन प्रमुखांनी सुरू केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरात चौथ्यांदा एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ हा त्यांचा उपक्रम अभिनंदनीय असा म्हणावा लागेल. आतापर्यंत महाराष्ट्रात नऊ ठिकाणी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पार पडला. प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून मिळाला आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या अभियानापेक्षा ‘जळगावचा कार्यक्रम सरस ठरेल’ अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे. ३५ हजार लाभार्थ्यांकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहतील, असा आयोजकांनी अंदाज व्यक्त केला आहे. मुख्य कार्यक्रम दुपारी तीन वाजता होणार असला तरी सकाळी साडेआठ वाजेपासूनच कार्यक्रम स्थळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजिले आहे. कार्यक्रम स्थळी एकूण २४ स्टॉल उभारले असून याद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती संबंधित विविध खात्यांच्या वतीने अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे.

स्थानिक नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानात ‘रोजगार मेळाव्याचे आयोजन’ करण्यात आले असून सुमारे २ हजार ५०० रिक्त जागांवर त्याच ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने भरती केली जाणार आहे. ‘रोजगार मेळाव्याचे आयोजन’ हे ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना होणार आहे. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ येथून लाभार्थ्यांचा फायदा तर होणारच आहे. परंतु बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आयोजिलेला रोजगार मेळावा हे एक आकर्षण ठरणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियाना अंतर्गत एक कार्यक्रमातून जळगाव जिल्ह्याचे ‘सर्वच प्रश्न सुटतील’ अशी अपेक्षा करणे योग्य होणार नाही. तथापि जळगाव जिल्ह्याचे काही महत्त्वाच्या विकास प्रकल्पाला यानिमित्ताने चालना मिळावी आणि विविध विकासाचा अनुशेष भरून निघावा, ही अपेक्षा करणे गैर नाही. त्यात सिंचनाच्या प्रलंबित प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिल्यास त्यांना गती मिळेल. त्यापेक्षा पाडळसे धरण, बोदवड उपसा सिंचन प्रकल्प, गिरण्यातील बलून बंधारे, हतनुर धरणाचे वाढीव दरवाजे बांधून पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील रस्त्यांमुळे शहर बदनाम होत आहे. तो प्रश्न सुद्धा युद्ध पातळीवर सोडवावा.

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ‘कापूस उत्पादक शेतकरी’ सध्या त्याच्या ‘कापसाला भाव मिळत नाही’ म्हणून संकटात सापडलाय’ प्रतिक्विंटल कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा म्हणून निम्म्यापेक्षा जास्त कापूस शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक पडून आहे. सध्या कापूस पेरण्याचा हंगाम आला तरी शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकला गेलेला नाही. शेतकऱ्यांची १२ हजार रुपये प्रतिक्विंटल मागणी असली तरी सध्या ६ हजार रुपये बाजारभाव मिळतोय. त्यासाठी मधला मार्ग म्हणून त्याला वाढीव भावाच्या रुपाने महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान देता आले, तर  अडचणीत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला शासनातर्फे मदत होईल आणि त्याच्या घरातील शिल्लक असलेल्या कापसाची विक्री होऊन त्याला आर्थिक मदत होईल. कापसाला भाव मिळावा म्हणून जिल्ह्यातील विविध पक्षांकडून आणि शेतकरी संघटने कडून अनेक वेळा आंदोलने सुद्धा झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आलेले कापसा संदर्भात बेमुदत आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. आता अनयासे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त जळगावी येत आहेत. त्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कापसाबाबत काहीतरी तोडगा काढून त्याची घोषणा झाली तर जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी आपल्याला दुवा देतील. कृपया शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार व्हावा, ही विनंती.. केळी उत्पादक, कांदा उत्पादक, ज्वारी, सोयाबीन उत्पादक यांच्यासाठीही मागण्या आहेत. त्या आपणाकडून सोडविल्या जातीलच. या निमित्ताने ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाला आमच्या हार्दिक शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.