सुरेश दादांच्या अधिकृत पक्षनिर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा

0

लोकशाही कव्हर स्टोरी

जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना घरकुल घोटाळ्यात हायकोर्टाकडून नियमित जामीन झाल्यानंतर तब्बल साडेतीन वर्षानंतर जळगाव शहरात आगमन झाले. तर त्यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांतर्फे तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य चाहत्यांकडून अभूतपूर्व असे जल्लोषात स्वागत झाले. जळगाव रेल्वे स्टेशनवर जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे दादा गहिवरून गेले. सुरेश दादा शिवाजीनगरच्या निवासस्थानी पोहोचले, तेथे त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. सुरेश दादा पुन्हा सक्रिय राजकारणात येणार, असे तर्कवितर्क लावून त्यांनी सक्रिय राजकारणात येऊन जळगावच्या राजकारणात आलेली मरगळ दूर करावी, असा त्यांच्या चाहत्यांचा सूर होता आणि आहे..

तथापि सुरेशदादा आपल्या पक्षात यावे अशी फिल्डिंग विविध राजकीय पक्षांकडून लावली जात आहे. सुरेश दादा मूळचे सच्चे शिवसैनिक व बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेचे नेते. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दावा केला जातोय ‘सुरेश दादा हे शिवसेना उद्धव गटाचे नेते आहेत’. शिवसेना शिंदे गट म्हणतो आमचीच शिवसेना खरी असल्याने ‘ते आमचेच’. त्यामुळे सुरेश दादा यांच्यासमोर कोणती शिवसेना खरी हा मोठा पेच असला तरी जळगावतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव गटाचे कार्यकर्ते जाहीरपणे सुरेश दादा आमचेच नेते आहेत, असे घोषित करीत आहेत. तथापि मुख्यमंत्री शिंदे गटातर्फे सुद्धा जळगाव शहरात दादांच्या स्वागताचे फलक लावून दादांवरील शिंदे गटाची निष्ठा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुरेश दादा जैन यांच्यासमोर शिवसेनेच्या संदर्भात मनात द्विधा परिस्थिती निर्माण झालेली असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच की काय सुरेश दादा जैन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना पहिली पसंती असल्याची भावना जाहीर व्यक्त केली. जेणेकरून सुरेश दादा जैन यांचा वारस होण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

घरकुल घोटाळ्यातील संघर्षानंतर आता दादांनी सक्रिय राजकारण करण्याची अनिच्छा व्यक्त केली आहे. कुटुंबाचा विरोध आणि वाढते वयोमान याचे कारण सुरेश दादांकडून सांगण्यात येत असले तरी सक्रिय राजकारणात प्रत्यक्ष दादा उतरले नाही तरी चालेल, पण जळगाव शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी सुरेश दादा आमच्याच पक्षात असावे, त्यांचे मार्गदर्शन व सल्ला मोलाचा असून ते आपल्या पक्षात असणे हे पक्षासाठी चैतन्य निर्माण करणारे असेल असे वाटते. सुरेश दादा जळगाव आत येऊन पाच दिवस झाले. या पाच दिवसात त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटून त्यांचे स्वागत करणाऱ्यांची रीग काही अद्याप संपत नाही. दादांच्या निवासस्थानी भेटून खुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. सुरेश दादा जैन यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, अन राजकारण करतोय, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सुरेश दादांनी राजकीय मैदानात उतरावे असे आवाहनही केले. याचा अर्थ पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुरेश दादांना आपल्या राजकीय गुरुस्थानी मानतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात, हे स्पष्ट होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुरेश दादा जैन यांना शिंदे गटात आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाकडून शहरात फलका द्वारे केलेले स्वागत आणि पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेले स्वागत तसेच गुरुस्थानी दिलेले मान पाहता दादा हे शिंदे गटाचे राहतील हे स्पष्ट होते.

केंद्रात भाजपची निर्विवाद सत्ता असून महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात भाजप गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर आहे. भाजपचे मंत्री ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे समर्थक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरेश दादा जैन यांचे निवासस्थानी जाऊन भेट घेऊन स्वागत केले. तेव्हा दादांनी दोघांचा दूध संघाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल सत्कारही केला आणि सोबत स्नेहभोजन घेतले. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले दादांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहे. त्यामुळे ‘सुरेश दादा साडेतीन वर्षानंतर जळगाव परतल्याने मी त्यांच्या स्वागतासाठी गेलो’ असे गिरीश महाजन यांनी सांगितले. सुरेश दादांनी भाजपात प्रवेश करावा या संदर्भात काही चर्चा झाली का? या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ‘याबाबत चर्चा झाली नाही. तथापि कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय घेण्यास दादा समर्थ आहेत’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावरून हे स्पष्ट होते की सुरेश दादांनी भाजपात यावे अशी गिरीश महाजनांची सुप्त आहे.

सुरेश दादा जैन आगामी काळात कोणत्या पक्षात राहतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण जळगाव शहराची दुरावस्था झाली आहे, ती आजपर्यंत कधीही झालेली नव्हती. जळगावकरांना नागरी सुविधांची उपलब्धता हा सध्या कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे. राजकारणाच्या साठमारीत जळगावकर भरडले जात असून, शहराच्या विकासाची अवहेलना होत आहे. त्यामुळे सुरेश दादांची शहरासाठी उपस्थिती सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. तथापि दादांनी आतापर्यंत जनतेच्या हितासाठी राजकीय पक्ष बदलले आहेत. ‘जनतेच्या हितासाठी शंभर वेळा पक्ष बदलला लागला तरी मी बदलणार’, असे ठामपणे आपले मत मांडणारे सुरेश दादा आपल्या दहा वर्षाच्या राजकीय विजनवासानंतर आता कोणत्या पक्षात राहणे पसंत करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरेश दादांकडून अधिकृत निर्णय केव्हा होतो याची सर्वजण वाट पाहत आहेत….!

धों. ज. गुरव

सल्लागार संपादक
दै. लोकशाही, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.