‘नवरदेवा’विना आघाडीचे ‘वऱ्हाड’!

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जळगाव व रावेर मतदारसंघ राज्यात चर्चेत आहेत. कधी नव्हे ते उमेदवारी निश्चितीचा तिढा घट्ट होत आहे. महाविकास आघाडीमधील शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपला शह देण्याच्या तयारी असली तरी दोघांनाही उमेदवार सापडत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ‘नवरदेवा’विना ‘वऱ्हाड’ अशी गत महाविकास आघाडीचे होवून बसली आहे.

राज्याची सत्ता हातून गेल्यानंतर महाविकास आघाडी कावरीबावरी झाली आहे. महाविकासमधील बरेच दिग्गज भाजप, शिंदेसेना, अजित पवार गटात दाखल झाल्याने त्यांच्यासमोर उमेदवारी निश्चितीचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुसरीकडे उमेदवारीबाबत हिरवा कंदील मिळालेला नसतानाही भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे सोशल मीडियावर सक्रिय झालेले आहेत. महाविकास आघाडीमधील पक्षांचे एकमत होत नसल्याने जागेचा तिढा सोडवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जळगाव व रावेर हे मतदारसंघ चर्चेत आले आहेत. कधी नव्हे ते उमेदवारी निश्चितीचा तिढा थेट मुंबई दरबारी पोहोचला असून, मागील पंधरवड्यापासून महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत खल सुरू आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आपल्या उमेदवारी बाबत जाहीर नकार दिला असला तरी त्यांच्या श्रेष्ठींशी गाठीभेटी वाढल्या आहेत. अंतर्गत वादामुळे एकनाथराव खडसे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील हे संतोष चौधरी यांच्या उमेदवारीत खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. खडसे सांगतील तोच उमेदवार राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार आहे. संतोष चौधरी यांचे नाव पुढे आल्यानंतर ॲड. रवींद्र पाटील यांनीही लढण्याचे इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केली असली तरी त्यात कुणाचा नंबर लागतो हे लवकरच समोर येणार आहे. आजच उमेदवाराचे नाव जाहीर केले तर नाराजीनाट्य उफाळून येण्याची शक्यता अधिक असल्याने श्रेष्ठी सावध पाऊले टाकत आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आल्यानंतर संपर्क प्रमुख संजय सावंत अधिक जोमाने सक्रिय झालेले आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत ॲड. ललिता पाटील यांनी शिवबंध बांधले असले तरी त्यांच्या उमेदवारीला काहींनी विरोध दर्शविला आहे. उद्धवसेना आयात व सक्षम उमेदवाराचा शोध घेत असून भाजपत भुकंप घडविण्याचा त्यांचा मनोदय असला तरी ते सोपे नक्कीच नाही. जिल्ह्यातील स्थानिक नेते मातोश्रीच्या दरबारी दाखल झाले असून ते उमेदवारी घोषित करण्याची मागणी रेटत आहे. मात्र उद्धव ठाकरे व त्यांचे नेते सावधपणाने चाचपणी करीत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या विचार येथे कुणीही लक्षात घेत नाही. काँग्रेसला स्थानिक महाविकास आघाडीनेच अडगळीत टाकले आहे. एकंदरीत काय तर ‘नवरदेवा’विना ‘वऱ्हाडी’ अशी गत महाविकास आघाडीची झालेली आहे. कार्यकर्त्यांसमोर कुठला झेंडा हाती घ्यावा हा प्रश्नच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.