विजयाच्या वाटेवरील ‘काटे’!

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या ‘हॅट्रिक’ च्या वाटेमध्ये स्वपक्षातील नेत्यांसह महायुतीतील घटक पक्षांनीच काटे पेरण्यास सुरुवात केल्याने सोपा असलेला विजयश्री अवघड करुन ठेवला जात आहे. भाजपची संघटनात्मक ताकद आणि तब्बल चार आमदार महायुतीचे असतानाही महायुतीसाठी सोपी असलेली ही वाट बिकट केली जात आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अद्यापही उमेदवार दिला नसतांनाही आतापासून निवडणूक हेतूपुरस्कर कठीण केली जात आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठीच स्वपक्षातील नेत्यांनी पुढाकार घेतल्याने वरिष्ठ पातळीवरुन सावध पाऊले टाकली जात आहेत.

रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला प्रारंभी भाजपच्या काही ठराविक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवून राजीनामे देवून पक्षासमोर संकट उभे केले होते. मात्र पक्षाचे संकटमोचक असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बैठकीत हे राजीनामे फेटाळून त्या कार्यकर्त्यांची ‘हवा’ काढली, मात्र त्याला आठवडा उलटत नाही तोच कोअर कमेटीमधील चित्रफित समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करुन भाजपला घरचा आहेर दिला. मुळात कोअर कमेटीमध्ये पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित असतांना कोण कुठला कार्यकर्ता बैठकीची चित्रफितच समोर आणत असेल तर तो ‘फितूर’ कोण हे भाजपला शोधणे कठीण मुळीच नाही. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जात असतांना अशा प्रकारची शिस्त मोडली जात असले तर त्यांच्या शिस्तीचा काय उपयोग? आयाराम-गयाराम वाढल्यामुळे काँग्रेसप्रमाणे भाजपचेही वाभाडे बाहेर येत असतील तर अशा बेशिस्त लोकांना ‘बाहेर’ काढणे हाच कार्यक्रम भाजपला हाती घावा लागणार आहे.

सद्यस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघात महायुती म्हणायला तरी भक्कम असून, चार आमदार महायुतीतले आहेत. काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी या मतदारसंघात आहेत. त्यामुळे महायुतीचे पारडे जड मानले जात असतांनाही हे पारडेच स्वपक्षीय उलटे करण्याच्या भूमिकेत वावरत आहेत. गेल्या वेळेस रक्षा खडसे यांच्यासमोर आव्हान उभे करणारे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे भाजपवासी झाल्याने आता तो विरोधही मावळला आहे असे म्हणता येईल; मात्र डॉ. उल्हास पाटील ज्यावेळी तन-मन-धनाने भाजपसाठी प्रचारात सहभागी होतील तेव्हाच त्याला अर्थ येणार आहे. ‘अबकी बार चार सौ’ पार असा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट सुकर करणे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे; त्याकडे अधिकाधिक लक्ष देणे क्रमप्राप्त असतांना स्वहितासाठी कुणी उमेदवाराला विरोध करीत असेल तर त्याला त्याची ‘जागा’ दाखविणे आवश्यक होवून बसले आहे. असो तो भाजपचा अंतर्गत विषय असला तरी सोपा असलेला ‘पेपर’ हाताने ‘कठीण’ करणे परवडणारे नक्कीच नाही !

Leave A Reply

Your email address will not be published.