उन्हाळ्यातील आजार आणि उपचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘आला उन्हाळा तब्बेत सांभाळा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आणि सध्या म्हणजे अलीकडच्या काही दशकांमध्ये याच म्हणीचा अन्वयार्थ अक्षरशः आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो आहे. ऋतुचक्राप्रमाणे आपल्याकडे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा असे चार चार महिन्यांचे चक्र सुरु असते. परंतु अगदी मार्च महिना सुरु होताच तापमान वाढायला सुरवात होते. हवामानात आणि वातावरणात देखील बदल घडू लागतात आणि एप्रिल, मे या दोन महिन्यांचा विचार केला तर काही वर्षांमध्ये सातत्याने या दोन महिन्यांमध्ये तापमानाने अगदी उच्चांकी आकडे गाठलेले दिसतात.

मुंबई सारख्या महानगरांमध्ये ३८ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाचे आकडे यापूर्वी गेलेले नव्हते परंतु आता उष्णतामान हे ४० अंशापुढे सरकू लागलेले आहे. एवढा कडक उन्हाळा आपण प्रत्येकजण दरवर्षीच अनुभवत आहोत. यंदा तर तापमानाच्या आकड्यानी मागील अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडलेले आहे. या वाढत्या उष्णतामानाचे गंभीर दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होणारच. प्रचंड वाढते तापमान आणि त्यामुळेच नवनवीन उद्भवणारे आजार हि आता सवयीची बाब बनलेली आहे.

उन्हाळ्यात जे आजार उद्भवतात ते नेमके कोणते ? आणि या आजरांवर नेमके उपचार काय आहेत या विषयी नागपूरचे डॉ. निखिल बालंखे यांच्याशी लोकशाही ~ लोकलाईव्हने केलेली बातचीत..

१] ऋतुचक्राप्रमाणे जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा हवामान आणि वातावरणात बदल होतो. उन्हाळ्यात तर तापमान प्रचंड वाढलेले असते ज्याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. उन्हाळ्यात प्रामुख्याने कोणते आजार उदभवतात ?

– आपल्याकडे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हवेतून आणि पाण्यातून उदभवणारे व्हायरल आजार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. परंतु उन्हाळ्यात तापमान प्रचंड वाढलेले असते ज्यामुळे बॅक्टेरियल आजार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. यामध्ये मुख्यतः गॅस्ट्रोचा आजार हा मोठ्या प्रमाणात उद्भवतो. उलट्या होणे, जुलाब, कावीळ, मुतखडा, मूळव्याध आणि जास्त तापमानामुळे कधी विदर्भात आणि आता तर शहरांमध्ये देखील उष्माघातासारखे विकार बळावतात. उन्हाळ्यात विशेषतः संसर्गजन्य आजार मोठया प्रमाणात उद्भवतात.

२] उन्हाळ्यात गॅस्ट्रो हा आजार मोठया प्रमाणात होतो हा आजार नेमका काय आहे ?

– गॅस्ट्रो इंट्रायसिस्ट हा आजार सामान्यपणे लहान मुलांमध्ये होतो. परंतु मोठ्यांना देखील होतो. २०१९ मध्ये आपल्याकडे कोविड आला आणि त्यानंतर हात वारंवार साबणाने स्वच्छ धुण्याची सगळ्यांनाच सवय लागली त्यामुळे गॅस्ट्रोची बाधा होण्याचे प्रमाण हे खूपच कमी झालेले आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि डिहायड्रेशनमुळॆ मग जुलाब उलट्या होऊ लागतात. आपल्या शरीराच्या आतमध्ये जी पचनसंस्था आहे ती बिघडते याला कारण
म्हणजे अस्वच्छता. मात्र गॅस्ट्रो वर इलाज म्हणजे इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी पिणे. भरपूर प्रमाणात पाणी पिणे, फळांचा ताजा रस पिणे. आहारात ताक आणि दही किंवा मठ्ठा याचा मोठया प्रमाणात समावेश करणे हेच उपाय आहेत.

३] गॅस्ट्रोची लक्षण नेमकी काय असतात ?

गॅस्ट्रोची बाधा झालेल्या व्यक्तीला जुलाब आणि उलट्या सातत्याने होत असतात. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला सातत्याने जुलाब आणि उलट्या होत असतील आणि एका क्षणी असं वाटत कि त्याला प्रचंड अशक्तपणा आलेला आहे आणि तो काहीही हालचाल करू शकत नाही अशा वेळी लगेच रुग्णालयात जाण कधीही चांगलं. केवळ उलट्या आणि जुलाब होत आहेत म्हणून घरगुती उपचार करून दुर्लक्ष केलं तर मेंदू किंवा किडनीला धोका देखील संभवतो.

४] गॅस्ट्रोच्या रुग्णाने आहाराच्या बाबतीत नेमकं काय पथ्य पाळावं ? म्हणजे थोडक्यात काय खाऊ नये ?

– कॉफी, चहा, दूध असे दुग्धजन्य पदार्थ असतात ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात जे पचनास हलके नसतात. ते टाळावेत. अगदीच दुधाची आवश्यकता असेल तर पाणी मिसळलेले दूध अशा रुग्णाला प्यायला द्यावे. ज्यांना मधुमेहाचा विकार आहे त्यांनी नियमित औषध न घेता आहार घेऊ नये त्यामुळे नवीन आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. जास्त तेलकट, मांसाहारी खाणे देखील टाळावे ज्यामुळे गॅस्ट्रोला आळा घालता येतो.

५] लहान मुलांमध्ये गॅस्ट्रोची बाधा होण्याचे प्रमाण हे जास्त असते असे का ?

लहान मुलांची पचनशक्ती हि मोठ्यांच्या तुलनेत जास्त नसते. त्यामुळेच जुलाब होणे, पोटात दुखणे याबरोबरच, मूल सुस्त देखील पडते कधी कधी .. शरीरातील क्षारांचं प्रमाण झपाट्याने खालावल्याने गॅस्ट्रोची बाधा होते. परंतु याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय योजिले पाहिजेत. अन्यथा अनेकदा किडनीवर परिणाम होऊन किंवा रक्तदाब वाढून, शरीरातील पोटॅशिम आणि सोडिअमचे प्रमाण कमी होऊन रुग्ण दगावू देखील शकतो. मात्र योग्य उपचार केले तर गॅस्ट्रोचे ८० टक्के रुग्ण हे बरे होतात. १० टक्के रुग्णांमध्येच गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतात.

६] उन्हाळयात उष्माघात होणे आणि ऊन लागणे असे आजार देखील होतातच हे आजार नेमके काय आहेत ?

हिट एक्झरशन म्हणजेच ऊन लागणे असं आपण म्हणतो. अनेकदा उन्हात जास्त फिरल्याने अशा व्यक्तीला ऊन लागले असं आपण म्हणतो त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे वाढलेले असते. उन्हातून आल्यानंतर खूप अशक्तपणा जाणवतो. काह्ही करण्याची इच्छा होत नाही. शरीरातील तापमानात बदल झाल्याने हा विकार उदभवतो. अशा व्यक्तीला डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेऊन, ताक दही प्यायला देऊन त्याच्या शरीराचं तापमान हे नॉर्मल वर आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हिट स्ट्रोक म्हणजे उष्माघात या आजारात मनुष्याच्या शरीराचं प्रचंड वाढलेले तापमान म्हणजे अगदी १०५ किंवा १०६ च्या वर गेलेलं तापमान हे अनेक प्रयत्न करून देखील कमी होत नाही ते सातत्याने वाढतच जात. त्यामुळे शरीराचे स्नायू काम करत नाहीत. अशा परिस्थितीत रुग्ण अगदी सुस्त होतो. कधी कधी तर रुग्ण दगावतो देखील. अशा व्यक्तीला नाकातून कोल्ड वाटर एनिमा देतात. ताक दही असे थंड पेय प्यायला देतात शिवाय त्याच्या शरीरावर थंड पाण्याने स्पंज करून तापमान कमी करण्याचा प्रयत्न केले जातात. हे विकार होऊ नयेत म्हणून जास्त वेळ
वातानुकूलित वातावरणात बसल्यानंतर एकदम बाहेरच्या उष्ण वातावरणात फिरणे टाळावे. ज्यांना सतत उन्हामध्ये काम करणं भाग असत अशा व्यक्तीने थंड पेय प्यावीत. शिवाय सातत्याने काम करण्यापेक्षा विश्रांती घेऊन काम करावं.

७] उष्माघात किंवा ऊन लागणे यासारखे आजार टाळायचे असतील तर नेमके उपाय काय ?

आपले कान संरक्षित करा. उन्हाळ्यात कानाला रुमालाने बांधून मगच उन्हात प्रवास करा. शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी प्यायला हवे. लिंबू सरबत हा उन्हाळ्यातील आजार टाळण्यासाठी असलेला उत्तम उपाय आहे. शिवाय इलेक्ट्रॉल पावडर देखील पाण्यातून घ्यायला हवी. शरीरातील सोडिअम आणि पोटॅशिअमची कमतरता भरून काढण्यासाठी शुद्ध फळांचा रस प्यावा. सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत शक्यतो उन्हात फिरू नये. बाहेरील प्रचंड उष्णतामानामुळे आपल्या शरीराचे तापमान देखील वाढते आणि आपण आजारी पडू शकतो. हे सगळे ऊन लागणे किंवा उष्माघात टाळण्यासाठीच अगदी सोपे उपाय आहेत.

८] उन्हाळयात शरीराचे तापमान खूप वाढले तर त्याचा परिणाम इतर अवयवांवर होतो का ?

बाहेरील उष्म्यामुळे अनेकांना जास्त घाम येतो. काहींना आंघोळीनंतर घाम येतो. घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होते आणि डिहायड्रेशनचा विकार बळावतो. ज्याचा परिणाम म्हणून मुतखडा देखील होऊ शकतो. लघवीमध्ये अनियमितता येते. त्यामुळे मुतखड्याचा आजार असलेल्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी. कॅल्शिअमच्या गोळ्या जास्त खाल्याने देखील किडनीवर परिणाम होऊ शकतो. ज्यांना तंबाखूची सवय असते अशा लोकांच्या शरीरात चुन्यामधून देखील कॅल्शियम वाढते आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो. शिवाय दुग्धजन्य पदार्थ जसे कि दूध, पनीर, टोमॅटो टाळावेत अशा पदार्थांमधून देखील शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढू शकते. मात्र आता किडनी स्टोन असेल तर त्याचा इलाज अगदी विना ऑपरेशन देखील होऊ शकतो. ज्यांना मुतखड्याचा विकार असेल त्यांनी भरपूर प्रमाणात पाणी प्यायलं तरी छोटा मुतखडा पाण्यावाटे पडून जाऊ शकतो. उन्हाळ्यात जास्त चमचमीत खाल्ल्याने मुळव्याधाचा
विकार देखील बळावतो. तेव्हा साधा आणि पौष्टिक आहार उन्हाळ्यात घ्यावा.

९] जास्त मद्यपानामुळे उन्हाळ्यात यकृतावर देखील दुष्परिणाम होऊ शकतो का ?

उन्हाळ्यात हिपॅटायसीसीस ए, बी,सी, इ असे व्हायरल आजार नेहमीच उद्भवतात. त्यापैकीच जास्त अल्कोहोलमुळे अल्कोहॉलीक हिपॅटायसीसीस हा विकार होतो. याप्रमाणेच अति औषधांच्या मात्रामुळे टॉक्सिन हिपॅटायसीसीस विकार होऊ शकतो. यासाठी हिपॅटायसीस टाळण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे असते. बी आणि सी प्रकारातील हिपॅटायसिस करीत आपल्याकडे लास उपलब्ध आहे. शिवाय ए आणि सी हिपॅटायसिसचा पाण्यातून आणि
खाद्यपदार्थांच्या द्वारे संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच विशेषतः हॉस्टेल, शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे गरजेचं आहे. मधुमेह असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनाही अशा हिपॅटायसिस आजारापासून बचावण्यासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे असते.

१०] उन्हाळ्यात कांजण्या हा आजार देखील अगदी लहानापासून मोठ्यानं देखील होतो त्यासंदर्भात काय सांगाल ? आणि टायफॉईड हा आजार नेमका काय आहे ?

८० ते ९० टक्के लोकांना कांजण्या हा आजार उन्हाळ्यात होतो तो हि अति उष्माघाताचा एक प्रकार आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजण्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर सुरवातीला पाण्यासारखे फोड येतात काही दिवसात त्यामध्ये पु भरतो आणि शेवटी खपली धरते. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे अशा रुग्णाचं विलगीकरण करण कधीही चांगलं. कांजण्या आजारावर देखील आपल्याकडे लस उपलब्ध आहे. लहानपणी ती प्रत्येकाला दिली जाते. मात्र हा
आजार कोणत्याही वयात कुणालाही होऊ शकतो. टायफॉईड मध्ये देखील शरीराचे तापमान हे वाढते आणि त्यामुळेच ताप येतो. अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या हि टॉयफाईड ची लक्षण आहेत. या आजारात ताप कमी जास्त होत असतो. त्यामुळेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीची चांगलं.

संकलन – संयोजन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६
इमेल -subodh.ranshevre @rediffmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.