सोशल मीडियामुळे घरोघरी जावून पत्रिका वाटण्याचा त्रास कमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. काळानुरूप राहणीमान व परिस्थितीनुसार अनेक प्रथा परंपरा मागे पडू लागल्या आहेत. लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका आता सोशल मीडिया वरून पाठवण्याचा ट्रेंड प्रचलित होत आहे. भरपूर लग्नपत्रिका छापून त्या घरोघरी जाऊन पोहोचवण्यासाठीचा अट्टाहास कमी झाला असून कार्यमालकांचा खर्च, वेळ आणि कोरोनाचा संपूर्ण जनजीवनावर परिणाम झाला आहे. लग्नसराईवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

धूमधडाक्यात होणाऱ्या लग्न समारंभाचा महत्त्वाचा एक भाग म्हणजे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापणे आणि वाटणे. त्यासाठी कार्यमालकाला खूप धावपळ करावी लागे. काही वर्षांपूर्वी लग्नपत्रिका घेऊन मुलामुलींचे वडील नातेवाईकांना आपल्या स्नेहीजनांना निमंत्रण देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जात होते. आस्थेने आपुलकीने निमंत्रण पत्रिका देऊन लग्नाला यायचं बरं का ? म्हणून सांगत होते.

मात्र या निमंत्रण पत्रिका वाटताना प्रवासात अनेकदा अपघातासारख्या घटनांमुळे गालबोट लागत असे. आजही ही पद्धत प्रचलित असली तरी गतिमान झालेल्या जगात त्याचे माध्यम नक्कीच बदलले आहे. सुविधा वाढल्यामुळे वेळ कमी झाला आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिनीसह समारंभातही सोयी-सुविधा वाढल्याने नवनवीन यंत्र आली अन् माणसांची गरज कमी झाली आहे. कुणालाही कुणासाठी या जगात थांबायला वेळ नाही. मग ती नाती असोत अथवा मैत्री. आठ दिवस चालणारे लग्नसमारंभ चार ते सहा तासांत उरकले जात आहेत. हौस मौजेसाठी बारेमाप खर्च होत असला तरी निर्मळ आनंद हरवला आहे. एकूणच सगळ्या गोष्टींची तुलना वेळ, श्रम अन् पैसा यांच्याशी होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. करोना काळात प्रवास आणि संचारबंदीमुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सध्या करोना निर्बंध हटले; तरी या सवयी कायम राहिल्या आहेत.

लग्नासह विविध समारंभाचे निमंत्रणही आता व्हॉटस्अॅपवर दिले जाऊ लागले आहेत. त्यातच सोशल मीडियाचा वापर करून सर्व प्रकारची निमंत्रणे, संदेश देण्याचे काम अगदी चुटकीसरशी होत आहेत. भरपूर लग्न पत्रिका छापून त्या पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा अट्टाहास कमी झाला आहे. व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांचा वापर करून घरातील लग्नाची निमंत्रणे आपल्या सहकारी मित्रांना, नातेवाईकांना घरबसल्या पाठवून दिवसाचे काम काही मिनिटांमध्ये होऊ लागले आहे.

जागतिक पातळीवरील अनेक घडामोडी सहजरीत्या क्षणार्धात अगदी खेडोपाड्यात पोहोचत आहेत. सध्या फेसबुक, ट्विटर, मॅसेंजर, व्हॉट्सअॅप या अॅप्लिकेशनमुळे त्वरित संपर्क होत आहे. जग जवळ आले तरी परंपरेच्या निमित्ताने का होईना एकत्र येणारी मने मात्र दुरावली आहेत. वास्तवापेक्षा आभासी दुनियेत ती जास्त रमू लागली आहेत. त्यामुळे संस्कार आणि परंपरांमधील बाज हरवू लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.