मतदानाचा टक्का वाढवणे सर्वच पक्षांपुढे आव्हान..!

0

लोकशाही संपादकीय लेख

१८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत तीन टप्प्यातील निवडणुकीकरिता मतदान पार पडले आहे. पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीकरिता झालेली मतदानाची टक्केवारी घसरल्याने चिंतेचा विषय बनली आहे. तर तिसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा म्हणावी तितकी मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही. अवघे ६१ टक्के इतके मतदान झाले. आता चौथ्या टप्प्यातील मतदान येथे १३ मे रोजी होणार असून ती मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. तथापि उष्णतेच्या लाटेचा फटका मतदानावर होतोय. महाराष्ट्रात उष्णतेचा पारा मे महिन्यात वाढताच राहतो. विशेषतः खानदेशात आणि त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यात तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान असल्याने मतदार घराबाहेर निघत नाहीत. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा मतदानाची टक्केवारी घसरली तर त्याचा फटका विशेषतः सत्ताधारी पक्षांना बसू शकतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे साडेचार लाख आणि साडेतीन लाखाच्या मताधिक्याने भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी ५५ ते ६० % इतके मतदान झाले होते. जर २०२४ च्या निवडणुकीत १३ मे रोजी जळगाव रावेर लोकसभेसाठी जर २०१९ च्या निवडणुकीपेक्षा कमी मतदानाची टक्केवारी झाली, तर त्याचा फटका म्हणून भाजपच्या उमेदवाराचे मताधिक कमी होऊ शकते. त्यामुळे जेवढे मताधिक्य २०१९ ला मिळाले होते तेवढे मताधिक्य आता २०२४ च्या निवडणुकीत मिळणार नाही. म्हणजे भाजपच्या उमेदवारांना टक्का घसरण्याचा फटका बसू शकतो एवढे, मात्र निश्चित. त्यामुळे भाजपला आपल्या उमेदवारांना मताधिक्याचा फटका बसू नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात जिथे चुरशीच्या लढती आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी मतदान म्हणजे ५१ % इतकेच मतदान झाले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदारसंघात कमी मतदान झाले. बारामती मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातील दबाव तंत्रामुळे मतदारांनी मतदान करायला घराबाहेर पडणे टाळले असल्याचा आरोप होतो आहे. तसाच प्रचार रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये असलेल्या टक्केवारीबाबत वाच्यता केली जात आहे.

२०१४ ते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. २०२४ च्या निवडणुकीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट महाराष्ट्रात तर दिसून येत नाही. त्यामुळे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी निवडणूक जिंकणे सोपे झाले होते. आता २०२४ च्या निवडणुकीत मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर सर्व उमेदवार तरले होते. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी जी आश्वासने दिली होती, ती दहा वर्षांच्या काळात पूर्ण झालेली नाही. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतोय, तरुण वर्ग नाराज आहे. सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त झालेली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आ वासून उभ्या आहेत. शेतकरी वर्गात कमालीची नाराजी आहे. इतर अनेक बाबी असल्या तरी हे जिल्ह्याचे प्रश्न असून त्याचा सुद्धा मतदानाच्या टक्केवारी घसरण्यावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरण्याचे हेही एक कारण असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याचा फटका सत्ताधारी महायुती सरकारला बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मताधिक्य घटले, असे महायुती आघाडीचे नेते जरी मान्य करीत असले, तरी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना त्याचा फायदा मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या बनल्या आहेत. परिणामी मतदानाचा टक्का वाढविणे हे सर्वच राजकीय पक्षांपुढे मोठे आव्हान करणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.