कृषिमंत्र्यांचा वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांवर गुन्हा

0

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर कापूस फेकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न धरणगावात झाला होता. याबाबत शिवसेना (ठाकरे) गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह १३ जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे बुधवारी जळगाव जिल्ह्यात आले होते. ते धरणगावकडून जात असताना शिवसेना (ठाकरे) गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कापसाला भाव देण्याची मागणी करीत त्यांच्या वाहनावर कापूस फेकला होता.
याप्रकरणी गुलाबराव रतन वाघ, नीलेश सुरेश चौधरी, भागवत भगवान चौधरी, ॲड. शरद माळी, राजेंद्र पुंडलिक ठाकरे, विजय माधवराव पाटील, विलास परशुराम वाघ, महेद्र भास्कर चौधरी, भरत भगवान महाजन, गणेश मराठे, राहुल रघुनाथ महाजन, बापूचावदास महाजन (सर्व रा. धरणगाव), माधव राजधर सूर्यवंशी (रा. साकरे) यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ मिलिंद सोनार यांनी याबाबत फिर्याद दिली.

आंदोलनासाठी पोलिस ठाण्याची कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला आणि मंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.