खळबळजनक; माझे पोस्टमार्टम जरा सांभाळून कर; मित्राला सांगत तरुणाची आत्महत्या…

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चोपडा शहरात रंगराव आबा नगरात धक्कादायक घटना बुधवारी सकाळी समोर आली. “माझे पोस्टमार्टम तुलाच करायचे आहे. जरा सांभाळून कर. डोके जास्त फाडू नको आणि माझ्या आईला माझी छिन्नविच्छिन्न केलेली बॉडी दाखवू नको” हे शब्द त्याने मित्राला सांगितले आणि तरुणाने दुसऱ्याच दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

खाजगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणारा तरुण गिरीश झुलाल पाटील असे या त्याचे नाव असून तो रंगराव आबानगर येथे राहत होता. मंगळवारी मध्यरात्री कुटुंबातील सर्वजण झोपल्यानंतर गिरीशने त्याच्या व्हाट्सअपवर ‘चल बाबू, बाय’ असे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्याने पहाटे घरातील जिन्याच्या लोखंडी बीमला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी कुटुंबीय उठल्यावर गिरीश हा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर आईने हंबरडाच फोडला. गिरीश हा रुग्णवाहिका चालक असल्याने त्याची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात चांगली ओळख होती. तर याच रुग्णालयात शवविच्छेदन करणारा प्रशांत पाटील (मामू) हा गिरीश याचा चांगला मित्र होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी गिरीश हा उपजिल्हा रुग्णालयात प्रशांत पाटीलला भेटला होता.

गिरीश त्याच्या परिवारातील एकुलता एक मुलगा होता. गिरीशच्या वडिलांचे निधन झाले आहे. गिरीश याच्या पश्चात आई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. एकुलता एक व कर्ता मुलगा असलेल्या गिरीशच्या मृत्येने त्याच्या आईचा आधार हरवला.

उद्या तुलाच माझेच पोस्टमार्टम करायचे आहे, सांभाळून करशील. डोके जास्त फाडू नको आणि माझ्या आईला माझी छिन्नविच्छिन्न केलेली बॉडी दाखवू नको, असेही गिरीशने प्रशांतला सांगितले होते. त्यावेळी प्रशांत यांनी जास्त बडबड करु नको. आपले काम कर असे गिरीशला सांगितले. त्याचे बोलणे खरेच होते हे सर्व संपल्यानंतर लक्षात आले. दुसऱ्या दिवशी गिरीश आत्महत्या करेल अशी पुसटशीही कल्पना प्रशांतने केली नव्हती.

दुसऱ्या दिवशी गिरीशचा मृतदेह प्रशांतकडे विच्छेदनासाठी आला. मित्राच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्याची वेळ प्रशांतवर आली. प्रशांतने थरथरत्या हातांनी मित्राच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करत विच्छेदन केले. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात गिरीशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.