खेडीकढोली येथील ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव शहराजवळ १५ किमी अंतरावर असलेल्या खेडीकढोली (ता. एरंडोल) येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरी विषारी द्रावण प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज ४ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर रमेश कोळी (३५) असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कोळी हा पत्नी व दोन मुलांसह एरंडोल तालुक्यातील खेडीकढोली येथे वास्तव्याला होता. शेतमजूरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहर करीत होता. ज्ञानेश्वर कोळी यांच्या शालकाच्या मुलीचे लग्न असल्याने पत्नी अनिता आणि दोन्ही मुलांसह  अमळनेर येथे लग्नासाठी बुधवार (ता. ३) सकाळी ९ वाजता गेले होते. त्यानंतर ज्ञानेश्वर हा दुपारी लग्न समारंभावरून अमळनेर येथून खेडीकढोली येथे परतला होता. त्यावेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले ही अमळनेरला थांबलेली होती.

घरी आल्याचे काही ग्रामस्थांनी त्याला रात्री ९ वाजेच्या सुमारास पाहिले होते. मध्यरात्री ज्ञानेश्वर कोळी याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी ७ वाजता उघडकीस आला. शेजारी आणि ग्रामस्थांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.