आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात पाटील यांनी कृषी मंत्र्यांना लेखी निवेदन त्यांनी दिले आहे. यात म्हटले आहे की, मा. सचिव सदस्य, जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती तथा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी जिल्हयातील सर्व विपणन अधिकारी / बियाणे वितरण / बियाणे विक्रेते, बियाणे कंपनी यांना उत्पादक कंपनी ते वितरण दिनांक १० मे २०२३ पासून पुढे, वितरक ते किरकोळ विक्रेते १५ मे २०२३ पासुन पुढे किरकोळ विक्रेता ते शेतकरी १ जुन २०२३ पासुन पुढे असे कापसु बियाणे पुरवठा व वितरणाचे आदेश दिले आहेत. मात्र जळगांव जिल्हयात काही तालुक्यामध्ये पाणी पातळी चांगली असल्यामुळे बरेचशे शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे १५ मे पासुनच कापुस पिकाची लागवड करतात.

अश्या परिस्थितीत जळगांव जिल्हयाच्या सिमेलगत मध्यप्रदेश व गुजरात राज्यांच्या सिमा असुन महाराष्ट्र राज्य शासनाने प्रमाणित केलेल्या कापुस बियाणे वाणांची विक्री करण्यास १ जुन २०२३ पर्यंत बंदी असल्यामुळे, दलांलामार्फत या गरजू शेतकरी बांधवाना गुजरात व मध्यप्रदेश राज्यातुन बोगस बियाणे विक्री करण्याची शक्यता आहे. बोगस बियाणांच्या विक्रीमुळे शेतकरी बांधवांची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांना दि. १५ मे २०२३ पासून बियाणे खरेदी करता यावे यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.