धक्कादायक; लग्नाहून परततांना भीषण अपघात; ११ जण जागीच ठार…

0

 

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सध्या अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये बुधवारी मध्यरात्री एक काळीज पिळवटून टाकणारा भीषण अपघात घडला आहे. लग्न आटोपून वऱ्हाडी घरी परतत असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात एकूण 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 5 महिला आणि 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच छत्तीसगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतारा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी हे धमतरी जिल्ह्यातील सोराम-भटगाव गावचे रहिवासी आहेत. लग्नसमारंभ आटोपून हे सर्वजण बोलेरो गाडीने घरी परतत होते. त्याचवेळी धमतरी-कांकेर राष्ट्रीय महामार्गावर कांकेरकडून येणारा ट्रक आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती बोलेरो गाडीचा यामध्ये अक्षरक्षः चुराडा झाला. मृतांमध्ये 4 पुरुष, 5 महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. बोरेलो गाडीतून 6 महिन्यांच्या चिमुरडीसह एकूण 11 जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच पुरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान पुरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अरुण कुमार साहू यांनी सांगितले की, या घटनेत जीव गमावलेले लोक कांकेर जिल्ह्यातील मरकाटोला गावातून लग्न समारंभ आटोपून घरी जाताना त्यांची बोलेरो ट्रकला धडकली. गाडीतील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका सहा महिन्याच्या चिमुकल्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालकाने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

दरम्यान, या घटनेनंतर छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दुःख व्यक्त केले आहे. “बालोदमधील पुरूर आणि चरमा दरम्यान लग्न समारंभासाठी जाणारी बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य देवो,” असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.