मुंबई ;- काँग्रेसची राज्यातील 10 उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली असून यासंदर्भातील माहिती काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन देण्यात आली आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या जालना लोकसभा निवडणुकीची जागा काँग्रेस पक्षाला सुटली आहे. काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.त्यामुळे केंद्रीय मांत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. काळे यांच्या लढा होणार आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्छाव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता जालण्यात भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांच्या विरोधात भाजपाचे सुभाष भामरे असणार आहेत.
यंदा जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये २००९ मध्ये थेट लढत झाली होती. तेव्हा रावसाहेब दानवे यांना ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली होती तर कल्याण काळे यांना ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. त्यात दानवेंचा अवघ्या साडे आठ हजार मतांनी विजय झाला होता.
कल्याण काळे हे माजी आमदार असून 2009 साली त्यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा केवळ 8 हजार मतांनी पराभव झाला होता. नंतर 2014 आणि 2019 सालीही रावसाहेब दानवे जालन्यातून निवडून आले.