राजछाया इनोवेटीव्ह कंपनीचा ठेका होणार रद्द !
आयुक्तांकडे प्रस्ताव सादर : रुग्णवाहिका चालकांना मिळणार न्याय
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेचा ठेकेदार असलेल्या मुंबई येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनी ठेका लवकरच रद्द होणार असून तसा प्रस्ताव आरोग्य व सेवा अभियान विभागाच्या आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून रुग्णवाहिका चालकांना न्याय दिला जाईल अशी माहिती खरेदी कक्षाचे सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक ठेकेदार असलेल्या राजछाया इनोवेटीव्ह कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आक्रमक झाले होते. सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांची भेट घेवून त्यांनी निवेदनही दिले होते. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही चौकशी करुन कारवाई करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली होती. खरेदी कक्षाचे सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांनी सांगितले की, संबंधीत ठेकेदाराबद्दल रुग्णवाहिका चालकांनी तक्रारी केल्या होत्या; या तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी देखील करण्यात आली असून त्यात तथ्य असल्याने ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
लवकरच होणार कारवाई
सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांनी सांगितले की, आयुक्तांकडे संपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यात ठेका रद्द करण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आयुक्तांकडे निवडणुकीचे अतिरिक्त काम असल्याने येत्या आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पार पडणार आहे.