अवैध दारू विक्री प्रकरणी धडाकेबाज कामगिरी, ३६ गुन्हे दाखल; ३५ जण अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीवर मोहीम राबविण्याच्या उत्पादन शुल्क विभागास सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धडाडीने काम करत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यात १३१८ गुन्हे नोंदवत २ कोटी २५ लाख ८० हजार २३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षाच्या सात महिन्याच्या तुलनेत गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणात २२ टक्के वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाने ही कामगिरी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षी एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्याच्या कालावधीत १०८३ गुन्हे नोंदवत १ कोटी ६७ लाख २० हजार ५०२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावर्षीच्या एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ च्या सात महिन्यांत ५८ लाख ५९ हजार ७३३ रूपयांचा मुद्देमाल वाढीव मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुद्देमाल जप्तीत ३५ टक्केवाढ झाली आहे. मागील वर्षाच्या सात महिन्याच्या तुलनेत यावर्षी जप्त वाहने, कलम ९३, एमपीएडीए व बंधपत्र यामधील कारवाईत अनुक्रमे ६१ टक्के, १६०‌ टक्के, १०० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जळगाव जिल्ह्यात ३ व ४ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी छापेमारी करत ३६ गुन्हे नोंदवून ३५ आरोपींना अटक केली. या छापेमारी मध्ये ८ लाख २१ हजार ६४५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रसायन – ८०६० लीटर, गावठी दारू – ७२८. ५ लीटर, देशी दारू – २२६. ९ लीटर, विदेशी मद्य – २३. ४ लीटर, बियर- ३९ लीटर वाहने – ४  (१ चारचाकी व ३ दुचाकी) जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध मद्य विक्रीवरील कारवाईचे सत्र आगामी काळात ही चालूच राहणार आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.