जळगावच्या अब्रूची लक्तरे वेशीवर : वाली कोण?

0

लोकशाही विशेष लेख

सुंदर जळगाव स्वच्छ जळगाव आणि हिरवेगार जळगावची स्वप्न जळगावकरांना दाखवणारा राजकारण्यांनी जळगावच्या अब्रूचे दिंडवडे काढले आहेत. जळगाव महानगरपालिका 17 मजली प्रशासकीय इमारत ही जळगाव शहराची शान समजली जात होती. परंतु महापालिकेचे प्रशासन इतके खिळखिळे झाले आहे की, जळगाव शहराची यातून सुटका होईल की नाही? अशी शंका आता प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी आपल्या ओपन हार्ट बायपास सर्जरी होण्याआधी जळगाव शहराविषयी व्यक्त केलेली. ही व्यथा अंतर्मुख करणारी आहे. जळगाव शहराच्या विकासाचे तीन तेरा झाले आहेत.

जळगाव शहरातून तरसोद ते पाळधी हा ८० मीटरचा महामार्ग प्रस्थापित असताना तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे आणि नहीचे संचालक यांचे झालेल्या चर्चेनुसार ४५० कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर करण्यात आला असताना तरसोद ते पाळधी हा १५ किलोमीटरच्या महामार्ग फक्त ४० मीटरचा असल्याने ८० मीटरच्या महामार्गाचा प्रस्ताव बाजूला ठेवून जळगाव शहराच्या बाहेरून महामार्ग काढण्यात आला. याचे जळगावकर म्हणून दुःख होते. त्याचबरोबर जळगाव शहराच्या विकासाचा खेळ खंडोबा झाला आहे, तो महानगर पालिकेत असलेल्या रिकाम्या गांगाजळीमुळे. माझी बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाली की, मी शेवटपर्यंत जळगाव शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील, असे म्हणून यदाकदाचित बायपास सर्जरीत माझा मृत्यू झाला तर जळगाव विषयी असलेली अपूर्ण इच्छा पूर्ण करावी, अशा प्रकारे उद्विग्नपणे आपली इच्छा व्यक्त करणारे शिरीष बर्वे यांची तळमळ जळगावच्या राजकारण्यांनी लक्षात घेऊन जळगावच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून पुढे येणे गरजेचे आहे.

मात्र ते येतील का? हा खरा प्रश्न आहे. शिरीष बर्वे यांची बायपास सर्जरी यशस्वी होऊन त्यातून ते बरे व्हावेत हीच सबंध जळगावकरांच्या वतीने शुभेच्छा. तसेच या आजारातून ते बरे होऊन पुन्हा जळगाव शहरासाठी, जळगावकरांसाठी आपले योगदान देतील यात शंका नाही. परंतु शिरीष बर्वे यांची जळगाव शहर आणि जळगावकरांच्या प्रति असलेले प्रेम, जिव्हाळा, तळमळ याची आमचे राज्यकर्ते दखल घेतील का? हा खरा प्रश्न आहे…

जळगाव शहराच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. जळगाव शहराच्या खराब रस्त्यांबाबत जेवढी चर्चा होते ते पाहता त्याची गिनीज बुकात नोंद होईल. ‘एक जळगावकर.. असा दलिंदर होणे नाही..’ या विषयाला घेऊन एक नाटिका एका कलाकाराने सादर केली. ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या नाटिकेच्या माध्यमातून जळगावकर नागरिकांच्या डोळ्यात जणू अंजन घातले आहे. हा जळगावकर नागरिक म्हणतो “कुणी रस्ता देता का.. रस्ता..” असे घशाला ओरड पडेल इतक्या जोराने ओरडून आपली व्यथा व्यक्त करतो आहे. शहरातून, रस्त्यावरून चालायचे कसे? खड्ड्यातून जाताना हा जळगावकर थकलाय.. रस्त्यातील धुळीमुळे श्वास गुदमरतोय.. हे तो कलाकार म्हणत असला तरी प्रत्येक जळगावकरांचा श्वास गुदमरला आहे, हे त्या कलाकाराला सांगायचे आहे. तो कलाकार म्हणतो आता आश्वासनाचं गाजर नको, स्वच्छ हवा हवी आहे. भाऊ, दादा, मामा चांगला रस्ता द्या.. परंतु फुली मागचं गणित नडतय.. अशी कबुली सुद्धा हा दलिंदर जळगावकर देतोय. तो म्हणतो याचना करतो की, हे राज्यकर्त्या इतका कठोर का झालास? आता फुली नाही घेणार.. अशी खंत सुद्धा व्यक्त करून मतदार म्हणून भिकारी होणार नाही.. असाही निर्धार व्यक्त करतो. योगेश शुक्ल यांनी दिग्दर्शित केलेली ही नाटिका सोशल मीडियावर जोरदार प्रसारित होत आहे.

एकंदरीत जळगाव शहराच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना आमच्या राज्यकर्त्यांना त्याचे काही सोयरे सुतक नाही. परंतु आता जळगावकर जागरूक झाले आहेत. हे त्या निवडणुकीत त्यांचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. आता फुलीच्या राजकारणात फसायचे नाही, असे प्रत्येक जळगावकराला वाटत आहे. महानगरपालिकेतील प्रशासनाचा कोणीच वाली उरला नाही का? महापालिकेत जळगावकरांनी निवडून पाठवलेल्या आपल्या नगरसेवक प्रतिनिधींकडून पूरती निराशा झाली आहे. स्वतःचे राजकारण करून कुंडली करून घेण्यात सर्वच नगरसेवक गुंतलेले आहेत. महापालिका प्रशासनाचे प्रमुख असलेल्या आयुक्त पदाचा वाद गेल्या तीन महिन्यापासून सुटत नाही. कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण होऊन वर्ष झाले. त्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झाले. तथापि गेल्या चार महिन्यापासून महामार्गावर विजेचे पोल उभारले जाऊन सुद्धा महामार्गावरील दिवे पेटलेलेच नाही. महामार्ग अंधारात आहे. कारण काय तर ठेकेदारांचे बिल अदा केले गेले नसल्यामुळे ठेकेदारांकडून काम रोखून ठेवण्यात आले आहे. परंतु खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतचा महामार्ग अंधारात असल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण केले गेले तरी अंधारामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. हे जळगाव महानगरपालिकेला प्रशासन नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि शहराचे आमदार तसेच जिल्हा प्रशासनासाठी लांच्छनास्पद होय…!

Leave A Reply

Your email address will not be published.