मनपा अभियंता मारहाणी मागचे षडयंत्र

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव शहराचा सर्वच प्रभागात विकास कामाचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. गेल्या दहा वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजना आणि मलनित्सारण योजनेमुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. अनेक कॉलन्यांमध्ये रस्त्यांबरोबर गटारी सुद्धा नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येऊन रहिवाशांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट असल्याने विकास कामे विशेषतः मूलभूत नागरिक सुविधा सुद्धा दिल्या जाऊ शकत नाहीत. आता शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असल्याने शहरातील रस्ते बांधकामाला गती आली आहे. तरीसुद्धा ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या न्यायाप्रमाणे वजनदार लोकप्रतिनिधींच्या प्रभागात कामे होतात आणि जिथे खरोखर गरज आहे, त्या प्रभागात कामांकडे दुर्लक्ष होत आहे. शुक्रवारी काव्य चौकातील महापालिकेच्या युनिट कार्यालयातील शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन महाबळ परिसरातील देवेंद्र नगर मधील रहिवासी भूपेश कुलकर्णी यांनी गटारीच्या कामाचे मोजमाप करण्यासाठी विनंती करूनही येत नसल्याने अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशीलात लगावली. महापालिका अभियंताच्या अशा प्रकारे कार्यालयात जाऊन मारहाण करण्याच्या घटनेची कोणीही समर्थन करणार नाही. हा प्रकार निषेधार्ह आहे. रीतसर मागणी करून शांततेच्या मार्गाने वरिष्ठांकडे तक्रार करणे ऐवजी अभियंताला ड्युटीवर असताना मारहाण करणे म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार होईल.

चार वर्षांपूर्वी महापौर सीमा भोळे यांच्या दालनात नगरसेविकेच्या पतीकडून मनपा कार्यकर्त्यावर खुर्ची उभारण्याचा प्रकार झाला होता. आता अभियंता अभियंता मारहाण प्रकरणाची दुसरी घटना होय. दोन्ही मारहाणीच्या घटनांकडे बारकाईने पाहिले तर शहरातील समस्यांनी पीडित सर्वसामान्य नागरिकांकडून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याची हिंमत होणार नाही. नागरिक त्रास सहन करतात परंतु अशा प्रकारे टोकाची भूमिका शहरवासीयांकडून घेतली जात नाही. वास्तविक शहरवासीय पीडित नागरिकांच्या संतापाचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. याबाबत मनपा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी हे ठेकेदार बनले आहेत. त्यांची ठेकेची कामे वेळेवर व्हावीत म्हणून ते एक प्रकारे अभियंत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात त्याचाच एक भाग म्हणजे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भूपेश कुलकर्णी यांनी केलेली मारहाण होय, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. गटारीच्या मोजमापासाठी विलंब करतोय म्हणून शाखा अभियंत्याला मारहाण करण्याची हिम्मत भूपेश कुलकर्णीने केलीच कशी? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर त्यामागे कोण आहे, हे स्पष्ट होईल. ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात असलेले साटे-लोटे सुद्धा तपासून पाहण्याची गरज आहे. वास्तविक महापालिकेतील ठेकेदारीवर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते.

शाखा अभियंता प्रसाद पुराणिक मारहाणीचे पडसाद महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये उमटणे साहजिक आहे. त्याबाबत सोमवार आणि मंगळवार ‘लेखणी बंद’ आंदोलन पुकारले. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण पाचशे सहाशे कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मूक मोर्चा काढला. तातडीने आरोपी अटक झाली नाही तर पाणी, वीज आणि स्वच्छता आदी अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्यात येतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला. पोलीस खात्याच्या आश्वासन नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांची कामे पुन्हा सुरळीत होतील. गेले दोन दिवस लेखणी बंद आंदोलनामुळे सर्व कामे ठप्प होती. अभियंता मारहाण प्रकरणी मनपा कर्मचारी यादी आणि अधिकाऱ्यांनी आवाज उठवला. हा त्यांचा हक्क आहे. अन्यथा कोणीही कुणावरही हात उभारण्याचे प्रकार होऊ शकतात. तथापि अभियंता प्रसाद पुराणिक मारहाण प्रकरणाच्या मागचे षयंत्र शोधून काढले पाहिजे. त्याचे पाठीमागे कोणाचा हात आहे? हे आरोपीकडून पोलीस तपासात निष्पन्न होईल, ते काम पोलिसांनी करावे. तसेच महापालिका प्रशासनाने हे लक्षात घ्यावे की, शहरवासीयांच्या संतापाचा उद्रेक होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.