जिल्ह्यातील भाजपच्या प्रस्थापितांना धक्का

0

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्ह्यातील (बीड जिल्हा वगळून) जिल्हाध्यक्षांची निवड प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जाहीर केली. यंदा जिल्ह्यासाठी दोन ऐवजी तीन जिल्हाध्यक्ष निवडले गेले. या वेळच्या जिल्हाध्यक्षांमध्ये तरुण रक्ताला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमधील प्रस्थापित जिल्हाध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, त्यांना फार मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा क्षेत्रासाठी एक, जळगाव (Jalgaon) लोकसभा क्षेत्रासाठी एक आणि जळगाव महानगर अध्यक्ष एक अशा तिघांची निवड करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (Dnyaneshwar Maharaj Jalkekar) हे शिवसेनेतून २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपात आले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या मतदारसंघातील जळकेकर महाराज असून शिवसेनेत असताना जळकेकर महाराज आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता.

जळगाव लोकसभा क्षेत्रासाठी त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. रावेर लोकसभा क्षेत्रासाठी माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांची सुपुत्र अमोल जावळे यांची भाजपने जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर रावेर लोकसभा क्षेत्राच्या संघटनेची जबाबदारी सोपवली आहे. जळगाव शहर महानगराध्यक्षपदी उज्वला बेंडाळे (Ujwala Bendale) यांना संधी देऊन भाजपने तरुण रक्ताकडे संघटनेची जबाबदारी सोपवल्याने अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा भाजपचे तिन्ही जिल्हाध्यक्ष तरुण असून ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्यावर जळगाव लोकसभा मतदार संघाच्या संघटनेची जबाबदारी सोपवून पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना एक प्रकारे भाजपने शह दिला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी गुलाबराव समोर भाजपचे फार मोठे आव्हान ठरणार आहे. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्यासाठी सुद्धा मोठे आव्हान असणार आहे. त्यावेळी पत्रकारांनी जळकेकर महाराजांना विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी समंजसपणे उत्तरे देऊन बाजी मारली. पक्षाचे आदेशाप्रमाणे पालन केले जाईल असे उत्तर देऊन युती आहे तोवर त्यांच्याशी वाकड्यात जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सांगून परिपक्वता दाखवली. त्यामुळे जळकेकर जोमाने काम करतील असे स्पष्ट चित्र दिसत आहे.

भाजपचे रावेर लोकसभा क्षेत्रासाठीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना वडील कै. हरिभाऊ जावळे यांची पुण्याई लाभली आहे. राजकीय वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला आहे. आतापर्यंत भाजपच्या जिल्हा संघटनेत त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. तथापि भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे ते एकनिष्ठ आहेत. अमोल पाटील हे लेवा समाजातील असल्याने तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत लेवा समाजाचे वर्चस्व असल्याने संघटना बांधणीसाठी अमोल जावळे यांचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर आगामी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप तर्फे उमेदवारांची जी चाचपणी चालली आहे त्यात अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा अग्रभागी आहे.

विद्यमान खासदार श्रीमती रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी दोन वेळा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या असल्या तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ खडसे हे आगामी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील तर सासरे आणि सून यांच्यातील सामना टाळण्यासाठी कदाचित रक्षा खडसेंच्या ठिकाणी भाजपतर्फे दुसरा उमेदवार दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी अमोल जावळे यांच्या नावाचा विचार भाजप तर्फे होऊ शकतो. त्यामुळे भाजपने अमोल जावळे यांचावर संघटनेची जबाबदारी देऊन रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी जावळेंसमोर आव्हान दिले आहे.

तिसरे जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नेमणूक करून महिलेला प्रथमच भाजपने संधी दिली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात गेले दोन टर्म आमदार राजूमामा भोळे हे भाजपतर्फे आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०२४ ची निवडणूक राजूमामांसाठी फार मोठे आव्हान ठरणारी आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहराची जी वाताहत झाली आहे ती राजू मामांसाठी अडचणीची ठरणार आहे. भाजपने केलेल्या रावेर जळगाव आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.

तसेच बदलत्या राजकीय परिस्थितीत जळगाव शहराच्या विद्यमान महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांनी जळगाव शहरात चांगले संबंध प्रस्थापित केले असल्याने भाजपला ते एक मोठे आव्हानच ठरणार असल्याने भाजप शहर महानगराध्यक्ष पदी उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करून त्यांच्यावर शहराची संघटना मात्र मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन आणि त्यांच्या आगामी कार्यास शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.