जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रिंप्राळा हुडको परिसरात दारू पिण्याच्या वादातून लाकडी दांड्याच्या साहाय्याने सख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीस जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सूत्रांनुसार, प्रिंप्राळा हुडको परिसरात प्रल्हाद तानू मरसाळे यांचा मुलगा दीपक आणि जय यांच्यात नेहमी दारी पिण्यावरून भांडण होते असे, १० ऑक्टोबर २०१९ ला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघं भावांमध्ये दारू पिण्यावरून भांडण झालं. यात रंगाच्या भारत जय याने दिपकच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून खून केला, तर वडील प्रल्हाद मरसाळे यांना दुखापत झाली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.
यात सरकारपक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात वडील प्रल्हाद मरसाळे, बहीण व भाचा यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यावरून न्यायाधीश मोहिते यांनी जय मरसाळे याला दोषी ठरवत भावाचा खून व वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दंडांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार संजय गोसावी आणि केसवॉच इक्बाल पिंजारी यांनी सहकार्य केले.