जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
लोंबकळलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने खेळणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज निमखेडी शिवारात सकाळी उघडकीस आली असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धनवी महेंद्र बाविस्कर (वय-५) रा. निमखेडी शिवारातील दत्त मंदीराजवळ असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , वादळी वारा आणि पावसामुळे निमखेडी शिवारात अनेक भागात विजेच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याने धनवी महेंद्र बाविस्कर हि चिमुकली
हि आज जळगाव शहरातील निमखेडी भागात सोमवारी २० मार्च रोजी शेजारी राहणाऱ्या लहान मुलांसोबत गल्लीत खेळत होती. त्यावेळी खेळता खेळता लोंबकळलेल्या एका विद्यूत तारेला चिमुकली धनवीचा स्पर्श झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तिला मृत घोषित केले.
याप्रसंगी रुग्णालय आवारात आई वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. वडील महेंद्र छगन बाविस्कर हे हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात तर घरी आई, आजी आणि एक बहीण असा परिवार आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान महावितरणने हलगर्जीपणा केल्याचा आरोप रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे.