नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क;
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाचं दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह ३४ कोटींच्या त्यांच्या अलिशान घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले आहेत. राकेश कमल, त्यांची पत्नी टीना आणि मुलगी एरियाना तिघांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र राकेश यांच्या मृतदेहाशेजारी बंदूक सापडल्यामुळे घरगुती हिंसाचाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
डोव्हर शहरात ही घटना घडली असून डोव्हर शहर मॅसॅच्युसेट्सची राजधानी बोस्टनच्या नैऋत्येस सुमारे 32 किलोमीटर अंतरावर आहे. राकेश आणि टीना एडुनोव्हा नावाची शिक्षण संस्था चालवत होते. अलिकडेच ती बंद झाली होती. ऑनलाईन रेकॉर्डवरून हे जोडपे गेल्या काही वर्षांपासून कठीण परिस्थितीतून जात होते. दरम्यान ही घटना सामूहिक आत्महत्या आहे की हत्या यासंदर्भात अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. वैद्यकीय अहवालाची आल्यानंतर याचा खुलासा होऊ शकेल. दोन दिवसांपासून या कुटुंबाचा काही ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे नातेवाईक त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली.