टीम इंडियाने बदलला 147 वर्षांचा इतिहास; पहिल्यांदाच इतक्या चेंडूंवर संपला सामना…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना दोन दिवसही होऊ शकला नाही. आणि या सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित झाले. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने कसोटी क्रिकेटचा 147 वर्षांचा इतिहासही बदलून टाकला. केवळ दोन दिवस चाललेल्या या सामन्यात केवळ 107 षटकांचाच खेळ झाला. यासह, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या षटकात सामना संपला.

अवघ्या 107 षटकांत सामना कसा संपला?

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसापासून गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशीच्या खेळात दोन्ही संघांनी मिळून एकूण 23 विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या सत्रातच ऑलआऊट झाला. नंतर टीम इंडियाही १५३ धावा करून ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 98 धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या दिवशी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला, पण पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी तीन विकेट गमावल्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा १७६ धावांवर ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य दिले होते. ज्याचा टीम इंडियाने 12 षटकांत पाठलाग केला आणि सामना अवघ्या 107 षटकांत संपला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने इतिहास रचला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला हा सामना केवळ 107 षटकांमध्ये म्हणजेच 642 चेंडूंमध्ये संपला आणि विशेष यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या षटकात सामना संपला आणि सामन्याचा निकालीही निघाला. यापूर्वी 1932 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना केवळ 109.2 षटकांमध्ये म्हणजेच 656 चेंडूंमध्ये संपला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

 

कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी चेंडूंनी संपलेल्या सामन्यांची यादी

642 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024

656 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, 1932

672 – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, 1935

788 – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, 1888

792 – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1888

Leave A Reply

Your email address will not be published.