मृत्तिका मल्लिक आणि दक्ष गोयल ठरले चेस चॅम्पियन…

महाराष्ट्राची संनिधी ठरली तृतीय तर पारस भोईर चौथा : राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पिअनशिप स्पर्धेचा समारोप

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अनुभूती निवासी शाळेत सुरु असलेल्या सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत काल नवव्या दिवशी अकरावी आणि अंतिम फेरी खेळवण्यात आली. गेली नऊ दिवस स्पर्धा अत्यंत रोमहर्षक सामन्यांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्सुकता ताणून धरली होती. एक एक सामना महत्वाचा असल्याने सर्व खेळाडूंनी आपल्या बुद्धिचातुर्याने ही स्पर्धा चपळाईने खेळून काढली. काहींना निराशा तर काहींनी आपला सर्वोत्तम खेळ दाखवत स्पर्धेत अग्रस्थान गाठले.

स्पर्धेच्या नवव्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत मुलांमध्ये दिल्लीच्या दक्ष गोयल याने साडे आठ गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले तर मुलींमध्ये प. बंगालच्या अग्रमानांकित असलेली खेळाडू मृत्तिका मल्लिक हिने ९ गुणांसह निर्विवादपणे जेतेपदावर आपलं नाव कोरलं. यावेळी मुलांमध्ये जिहान शाह (गुजरात), सम्यक धारेवा (बंगाल), पारस भोईर (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चौथे स्थान पटकावलं. तर मुलींमध्ये स्नेहा हालदार (बंगाल), संनिधी भट (महाराष्ट्र), शुभी गुप्ता (उत्तर प्रदेश) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि चौथे स्थान पटकावलं.

समारोपाप्रसंगी आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख यांनी सर्व खेळाडूंशी संवाद साधतांना आपल्या मनोगतात म्हटले की, हरणे जिंकणे हा खेळाचा भाग आहे. त्याला खिलाडूवृत्तीने घ्यायला शिका. आणि पुढच्यावेळी तितक्याच जोमाने तयारी करून स्पर्धेत उतरा. ज्यामुळे आपला स्वतःवरील आत्मविश्वास हा बळावेल आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी प्रवृत्त करेल. त्यामुळे खचून न जाता अविरतपणे आपली तपस्या सुरु ठेवा. सोबतच त्यांनी अशोक जैन व अतुल जैन यांच्यासह सर्व आयोजकांचे आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले, ते म्हणाले निसर्गाच्या सानिध्यात बुद्धीचा खेळ ही कल्पनाच भन्नाट आहे.

यावेळी चिफ अरबिटर देवाशीष बरुआ यांनी ही स्पर्धेचा सार मांडतांना म्हटले कि, स्पर्धा ही मुलांच्या उत्साहाने आणि त्यांच्यात असलेल्या अनुशासनाने अत्यंत सुरेख पार पडली, आणि त्याला साथ लाभली ती येथील शिस्तबद्ध व्यवस्थापन समितीची. त्यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने सर्व खेळाडू व पालकांना सहकार्य करत स्पर्धेला यशस्वीते कडे नेले. त्यांनी विशेषकरून अशोकभाऊ जैन व अतुल जैन यांचेही आभार मानले.

दरम्यान समारोपावेळी काही पालकांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये गोव्याच्या लिंडा फर्नांडिस यांनी निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक करतांना म्हटले कि, गोव्यात लोक समुद्र अनुभवायला येतात मात्र इथे मनशांती लाभली. सोबतच त्यांनी सुविधांसाठीही जैन इरिगेशनचे आभार मानले. सोबतच हिमाचल प्रदेश येथील अमित शर्मा यांनीही आपल्या अनुभवाचे कथन करतांना म्हटले कि, आयोजन नियोजन आणि शिस्तबद्धता खूप भावली.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते सर्व सामन्यांचे अरबीटर (पंच) यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच स्पर्धकांना मेडल व अतुल जैन यांनी जाहीर केल्या प्रमाणे सर्व सहभागी स्पर्धकांनाही रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या समारोप सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे अध्यक्ष व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ जैन, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असो. चे अध्यक्ष अतुल जैन, चीफ अरबीटर देवाशीष बरुआ (कोलकाता), महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे खजिनदार विलास म्हात्रे तसेच आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव नंदलाल गादीया, जळगाव जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार अरविंद देशपांडे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव निनाद पेडणेकर, अहमदनगर जिल्हा चेस सर्कलचे सचिव यशवंत बापट व पालघर जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार विवेक उधारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभूती निवासी स्कुलचे विद्यार्थी आदित्य सिंह व आरव मिश्रा यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकुश रक्ताडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.