कोहलीचे दमदार ४८वे शतक; टीम इंडियाचा विजयरथ कायम…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 256 धावा केल्या आणि टीम इंडियाला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य दिले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात विराट कोहलीचे नाबाद शतक आणि शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा चौथा विजय आहे. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आली आहे. चांगल्या धावगतीच्या आधारावर न्यूझीलंड भारतापेक्षा पुढे आहे.

बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. भारतीय संघाला पहिला धक्का रोहित शर्माच्या रूपाने बसला. रोहित 48 धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलसह क्रीजवर आलेल्या विराट कोहलीने टीम इंडियाच्या डावाची धुरा सांभाळली. गिलच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. गिल ५३ धावा करून परतला. गिल गेल्यानंतर विराट आणि अय्यरने मिळून संघाच्या धावांचा वेग वाढवला. मात्र, अय्यर 19 धावा करून बाद झाला. 178 धावांच्या स्कोअरवर टीम इंडियाला तिसरा धक्का बसला. मात्र यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने मिळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताकडून विराट कोहलीने 97 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी केली. तर केएल राहुल ३४ धावा करून नाबाद राहिला.

त्याचवेळी लिटन दास (66) आणि तनजीद हसन (51) या सलामीच्या जोडीने बांगलादेशला या सामन्यात चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली होती. मात्र यानंतर बांगलादेशने एकामागून एक चार विकेट गमावल्या. बांगलादेशची धावसंख्या १३७ धावांवर होती आणि त्यांचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र, यानंतर बांगलादेशच्या मधल्या फळीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने 38 धावा केल्या. तर महमुदुल्लाहने 46 धावांची इनिंग खेळली. भारताकडून रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2, तर कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.