जिल्ह्यातील अमृत कलक्षांचे वाजत-गाजत जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन

0

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची उपस्थिती

जिल्ह्यातील  कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे रवाना होणार

जळगाव ;-जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, नगरपंचायती यांनी जमा केलेले ‘अमृत कलश’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाजत-गाजत मिरवणूक काढत जमा करण्यात आले. हे सर्व अमृत कलश एकत्र करून जिल्ह्यातील एक कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई व दिल्ली येथे पाठविले जाणार आहेत.

जिल्ह्यातून एकत्रित केलेले अमृत कलक्ष आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या अमृत कलक्षांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त डॉ विद्या गायकवाड, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त जनार्दन पवार यांनी स्वागत केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या टॅगलाइनसह ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र अमृत कलक्ष यात्रा काढण्यात आल्या. ज्या कुटुंबांकडे शेती आहे अशा कुटुंबांतील सदस्यांकडून माती व ज्या कुटुंबांकडे शेती नाही अशा कुटुंबातील सदस्यांकडून एक चिमूटभर तांदूळ मातीच्या कलशात जमा करण्यात आले. तसेच सर्व नगरपरिषद यांनी शिलाफलकम समर्पण – वीरांच्या नामफलकाची स्थापना, पंचप्राण प्रतिज्ञा घेणे, वसुधा वंदन देशी झाडांच्या 75 रोपांसह अमृत वाटिकेची निर्मिती, वीरों का वंदन – देशाचे आणि शूरांच्या कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक / वीरांचा सन्मान राष्ट्रध्वज फडकवणे आणि राष्ट्रगीत गायन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय एक कलश व जळगाव महानगरपालिकेचा एक कलश बनविण्यात आला. बनविण्यात आलेला अमृत कलश मुंबई व दिल्ली येथे घेऊन जाण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत अमृत कलश मुंबई येथे २६ ऑक्टोंबर रोजी रवाना होतील तद्नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आझाद मैदान मुंबई येथे २७ ऑक्टोंबर रोजी कार्यक्रम संपन्न होईल. तदनंतर सर्व स्वयंसेवक कलश घेऊन २७ ऑक्टोंबर रोजी विशेष रेल्वेने दिल्ली येथे रवाना होतील. राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिट्टी को नमन, वीरों का वंदन हा सोहळा संपन्न होऊन देशभरातून जमा करण्यात आलेल्या मातीतून राजधानी दिल्ली येथे अमृत वाटिका व वॉर मेमोरिअल तयार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.