गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

0

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतनिधी

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुटुंबास मदतनिधी धनादेश दिला जाणार

जळगाव:- भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा मदतनिधी पिडितेच्या कुटुंबाच्या बॅंक खात्यात वर्ग केला जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै २०२३ रोजी घडली होती. यात संशयित आरोपी म्हणून स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय – १९) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. पाचोरा येथे १२ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबास शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल. अशी घोषणा केली होती. महिन्याभराच्या आत मुख्यमंत्र्यांनी या घोषणेची प्रतिपूर्ती केली आहे‌.

महाराष्ट्र शासनाकडून पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांचा मदत निधी वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच मदतनिधी धनादेश गोंडगाव येथे जाऊन दिला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे ‌.

Leave A Reply

Your email address will not be published.